गुरुवार, ११ जून, २०२६

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या 'ट्राफिक बडी'चा दणका; मे महिन्यात तब्बल १३६५ वाहतूक तक्रारींचा २४ तासांत केला यशस्वी निपटारा!



पिंपरी-चिंचवड, दि. ११ जून २०२६: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'ट्राफिक बडी' (Traffic Buddy) या ऑनलाईन व्हॉट्सॲप चॅटबॉट उपक्रमाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. माहे मे २०२६ या अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या एकूण १३६५ तक्रारींचे या चॅटबॉटद्वारे यशस्वी निवारण करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार आणि वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख यांच्या नियोजनाखाली शहरात हा डिजिटल उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे.

औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असून रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ लक्षणीय वाढली आहे. नागरिकांना दैनंदिन प्रवासात येणाऱ्या अडचणी थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता याव्यात, म्हणून चॅटबॉट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत नागरिकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहतूक कोंडी, रस्ता खराब असणे, बेकायदेशीर पार्किंग, बिघडलेले ट्रॅफिक सिग्नल आणि अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक यांसारख्या प्रमुख ८ विषयांवर थेट फोटोसह तक्रार नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे.

या डिजिटल उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत स्थानिक वाहतूक पोलिसांमार्फत त्या समस्येचे जागेवरच निवारण केले जाते. तसेच, तक्रारीचे यशस्वी निराकरण झाल्यानंतर संबंधित तक्रारदाराला व्हॉट्सॲप संदेशाद्वारे तात्काळ सुचित केले जाते. वाहतूक नियमन अधिक सक्षम करण्यासाठी शहरातील इच्छुक नागरिकांना या चॅटबॉटवर स्वयंसेवक (Volunteers) म्हणून नोंदणी करण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक सुधारेसाठी ८७८८६४९८८५ या व्हॉट्सॲप क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा