कमी वेळेत प्रचंड नफ्याच्या आमिषाला बळी पडू नका; आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आवाहन
पिंपरी चिंचवड: शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा आणि भिशीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ५ कोटी ३ लाख १४ हजार ३६८ रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आहेरकर कुटुंबाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. रमेश पुंजा आहेरकर, छाया रमेश आहेरकर, वेदांत रमेश आहेरकर आणि आदित्य रमेश आहेरकर (सर्व रा. शुभारंभ रेसिडेन्सी, माण, तालुका मुळशी, जिल्हा पुणे) अशी गजाआड झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गुंतवणूकदारांचा विश्वासघात करून हिंजवडी परिसरातील राहते घर बंद केले होते आणि स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होते. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत या चारही आरोपींना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथून अटक केली असून त्यांना २२ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी हनुमंत भागवत जाधव आणि इतर गुंतवणूकदारांना आरोपींनी प्रतिमहिना ४ ते ५ टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी त्यांनी वेदांत फायनान्स सर्व्हिसेस, त्रिवेणी पुजा भांडार आणि आदित्य इंटरप्रायझेस अशा वेगवेगळ्या फर्म स्थापन केल्या होत्या. गुंतवणूकदारांना कोणताही परतावा न देता आरोपींनी एकूण ४ कोटी १८ लाख २० हजार ८९० रुपयांचा थेट विश्वासघात केला. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(५), ३१८(४), ६१(२) आणि ३(५) सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशीकांत महावरकर, अपर आयुक्त (प्रादेशिक विभाग, अतिरिक्त कार्यभार गुन्हे) डॉ. बसवराज तेली, उप आयुक्त रोहीदास पवार आणि सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ आणि निरीक्षक सचिन शिर्के करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासी अधिकारी तथा सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे, अंमलदार सिद्धेश्वर सोनटक्के (बक्कल क्रमांक १९६३), आकाश पारधी (बक्कल क्रमांक ३५४४) आणि महिला अंमलदार प्रिया वसावे (बक्कल क्रमांक २२५८) यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
तपासादरम्यान पोलिसांनी वेदांत फायनान्शियल सर्व्हिसेस आणि आदित्य इंटरप्रायझेस या फर्मची तसेच आरोपींची वैयक्तिक अशी एकूण ११ बँक खाती 'डेबिट फ्रीज' (गोठवली) केली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चारही आरोपींच्या चल आणि अचल मालमत्तेचा शोध सुरू आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्रांतर्गत या फर्म्समार्फत कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड येथे किंवा सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे यांच्याशी ९६८९०५१५९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कमी कालावधीत दुप्पट-तिप्पट परतावा देणाऱ्या किंवा अनधिकृत भिशी योजनांमध्ये गुंतवणूक करू नये, असे आवाहन आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.
Labels: Pimpri Chinchwad Police, Share Market Fraud, Hinjewadi Crime, Economic Offences Wing, Financial Scam Mulshi, Aherkar Family Arrested.
Search Description: Pimpri Chinchwad Economic Offences Wing arrested the Aherkar family from Nevasa for cheating investors of Rs 5.03 Crore through fake share market and Bhishi schemes.
Hashtags: #PimpriChinchwad #ShareMarketScam #FinancialFraud #HinjewadiPolice #EconomicOffencesWing #CyberCrimePune #CrimeNews
Reviewed by ANN news network
on
६/२२/२०२६ ०३:४३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: