पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार भव्य 'संविधान भवन'; महापालिका स्थायी समिती सभेत कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी
पिंपरी, पुणे (दि. १० जून २०२६): पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या स्थायी समितीच्या महत्त्वपूर्ण सभेत विविध विभागांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रामुख्याने आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, शिक्षण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते देखभाल, तसेच सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेत 'क' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात लोकशाही मूल्यांच्या प्रसारासाठी 'संविधान भवन व विपश्यना केंद्र' उभारण्याच्या टप्पा क्र. १ च्या कामाला मान्यता देणे हा या सभेतील अत्यंत ऐतिहासिक निर्णय ठरला.
या बैठकीला स्थायी समिती सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व अभियंता उपस्थित होते.
आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांचा विस्तार
शहरातील वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाकडील पाणीपुरवठा पंप चालविणे, इमारतीमधील विद्युत व्यवस्थेची चालन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच नवीन भोसरी रुग्णालय व यमुनानगर रुग्णालयाच्या इमारतीतील अंतर्गत व बाह्य परिसर, पार्किंग आणि ड्रेनेज लाईनच्या दैनंदिन साफसफाईचे कंत्राट मंजूर करण्यात आले. नवीन थेरगाव रुग्णालयातील कोविड-१९ आपत्कालीन कालावधीत सीएसआर निधीतून प्राप्त ९ व्हेंटिलेटर व ३ मोबाईल एक्स-रे मशीनच्या देखभाल-दुरुस्ती करारास आणि वैद्यकीय विभागाकडील १७ व्हेंटिलेटर्सच्या सीएमसी (Comprehensive Maintenance Contract) ला मंजुरी देण्यात आली. याशिवाय वायसीएम रुग्णालयात आवश्यकतेनुसार विविध पदे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मानधन तत्त्वावर भरण्यास मान्यता देण्यात आली.
पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व रस्ते दुरुस्ती
पावसाळा तोंडावर असल्याने जलनिस्सारण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी थेरगाव, गांधीनगर, बालाजीनगर, संजय गांधी नगर, शांतीनगर या झोपडपट्टी भागांतील जलनिस्सारण नलिकांची देखभाल व दुरुस्ती मंजूर करण्यात आली. चिखली गावठाण, मोरे वस्ती, सोनवणे वस्ती, शेलार वस्ती, रामदास नगर, पाटीलनगर, रूपीनगर, तळवडे, संत तुकाराम नगर, पिंपळे सौदागर, रहाटणी आणि जुनी सांगवी येथील मुळानगर भागात नवीन ड्रेनेज नलिका टाकण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक १, ११, १२, १३, पिंपरी व रहाटणी परिसरात ड्रेनेज वाहिन्यांसाठी खोदलेल्या चरांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करून रस्ते पूर्ववत केले जातील.
यासोबतच नाशिक फाटा ते मोशी (एनएच-६०) महामार्ग, प्रजिमा-३१ रस्ता, भक्तीशक्ती चौक ते मुकाई चौक रस्ता आणि केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन रस्त्याची रस्ते देखभाल व दुरुस्ती मंजूर करण्यात आली. बीआरटीएस कॉरिडॉर क्र. १ मधील पावसाळी पाण्याच्या नलिकांची साफसफाई आणि पुणे-आळंदी रस्त्यावरील रोड फर्निचर पेंटिंगची कामे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राधान्याने केली जातील.
सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम
शैक्षणिक विभागात महापालिकेच्या मराठी माध्यम बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत शिक्षणांतर्गत लेखन साहित्य खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. सामाजिक सलोखा आणि सुव्यवस्थेसाठी महापालिका कार्यक्षेत्रातील मुस्लिम (३), ख्रिश्चन (१) व लिंगायत (१) दफनभूमी परिसरांच्या २४ तास देखभाल, स्वच्छता व सुरक्षेसाठी काळजीवाहकांची नेमणूक करण्यास मंजुरी देण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी तळवडे येथील बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी २८६ किलोवॅट नवीन उच्चदाब वीजपुरवठा घेण्यास मान्यता देण्यात आली. स्वच्छता अभियानांतर्गत नवी दिशा प्रकल्पांतर्गत प्रभाग क्रमांक ३०, दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्प चालविण्यास देण्यास मंजुरी देण्यात आली.
"पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकासासाठी स्थायी समिती कटिबद्ध आहे. आज मंजूर करण्यात आलेल्या संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्याच्या निर्णयामुळे शहराच्या वैचारिक आणि सामाजिक विकासाला मोठी दिशा मिळेल. यासोबतच जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असून मंजूर सर्व कामांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल."
— अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
Labels: Pimpri Chinchwad, PCMC Standing Committee, Abhishek Barne, Samvidhan Bhavan, Pune Infrastructure, YCM Hospital, Smart City Pimpri, Local Governance.
Search Description: PCMC Standing Committee led by Chairman Abhishek Barne approves major development projects including the historic Samvidhan Bhavan, healthcare upgrades at YCM, and pre-monsoon road and drainage repairs.
Hashtags: #PCMCElections #AbhishekBarne #SamvidhanBhavan #PimpriInfrastructure #YCMHospital #PimpriNews #PuneDevelopment
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: