पिंपरी, दि. १७ जून २०२६: पिंपरी चिंचवड शहरातील पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार नागरी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आज महापालिकेच्या स्थायी समिती सभेमध्ये विविध विभागांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी देण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, रस्ते विकास, आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण, स्वच्छता अभियान, राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पायाभूत सुविधांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावांना आणि निविदांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह विविध विभागांचे मुख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरी सुविधांचा विस्तार करताना सभेमध्ये प्रभाग क्रमांक ६ मधील चऱ्होली वसाहत, सद्गुरूनगर, लांडे वस्ती, देवकर वस्ती, मधुबन सोसायटी, महादेवनगर तसेच धावडे वस्ती, मेघा वस्ती, गुंडे वस्ती आणि श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील रस्ते उच्चदाब पद्धतीने आधुनिक स्वरूपात विकसित करण्याच्या कामांना मान्यता देण्यात आली. याच सोबतीने शहराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जलनिस्सारण व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी प्रभाग क्रमांक ९ व १० मधील मलनिस्सारण नलिकांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे ठरले. थेरगाव-काळेवाडी परिसरातील साईदत्तनगर, यशोधनगर, महात्मा फुले नगर, भारतमातानगर, राजीव गांधी नगर आणि 'अ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या विद्य्यानगर, दत्तनगर, शंकरनगर, इंदिरानगर, लालटोपीनगर, साईबाबानगर, रामनगर, जयमल्हारनगर, काळभोरनगर या झोपडपट्टी भागांत जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच 'फ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दुर्गानगर (आकुर्डी), अंजननगर, राजनगर, समतानगर (निगडी), सिद्धार्थनगर आणि मोरेवस्ती येथील कामे मंजूर करून क, ड आणि ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जलनिस्सारण नलिकांची आधुनिक यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागासाठी कम्प्युटराइज्ड रेडिओग्राफी प्रणालीच्या एक्स-रे फिल्म्स खरेदी करण्यास आणि सोनोग्राफी मशीनचा मदरबोर्ड बदलण्याच्या खर्चास मान्यता देण्यात आली. वायसीएम रुग्णालयाचे इलेक्ट्रिक सेफ्टी ऑडिट करण्यासह ह.भ.प. प्रभाकर महाराज कुटे रुग्णालय (आकुर्डी), जिजामाता रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालय येथे यांत्रिक पद्धतीने स्वच्छता सेवा सुरू ठेवण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यास मंजुरी देण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत भित्तीचित्रे व जनजागृती कामांना कार्योत्तर मान्यता देत, पल्स पोलिओ मोहिमेसाठी रिक्षा व मानधनाचा खर्च मंजूर करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवणे, पिंपळे सौदागर येथील मराठी मंदिर सांस्कृतिक भवनातील हॉल पोस्ट ऑफिससाठी भाड्याने देणे आणि अक्षयदा बडगुळे यांच्या लिपिक पदावरील पुनर्नियुक्तीच्या अर्जाला मंजुरी देण्यासारखे अनेक महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय या सभेत घेण्यात आले.
Labels:
PCMC Standing Committee,Abhishek Barne Chairman,Pimpri Chinchwad Development,YCM Hospital Upgradation,Smart City Pimpri,Drainage System ReformSearch Description: PCMC Standing Committee led by Chairman Abhishek Barne approves major development projects including road development, drainage reforms, and health sector upgrades.
Hashtags: #PCMC #PimpriChinchwad #AbhishekBarne #UrbanDevelopment #SmartCityPimpri #YCMHospital #MaharashtraNews #AstraNewsNetwork
Reviewed by ANN news network
on
६/१७/२०२६ ०७:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: