मंगळवार, २३ जून, २०२६

जेष्ठ समाजसेवक मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली खरातवाडीतील शेतकऱ्यांचे उपोषण; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सांगता

 

श्रीगोंदा (अहिल्यानगर), दि. २२ जून २०२६ (प्रतिनिधी): कुकडी डाव्या कालव्याच्या हक्काच्या पाण्यापासून वारंवार वंचित राहावे लागत असल्यामुळे खरातवाडी (पिंपळगाव पिसा) येथील शेतकऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक मारुती भापकर आणि कृष्णा यादव यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार दि. २२ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. कुकडीच्या रोटेशनचे पाणी मिळण्यात येणारे तांत्रिक अडथळे आणि नादुरुस्त चाऱ्यांची दुरुस्ती या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. अखेर सायंकाळी ५:३० वाजता कुकडी पाटबंधारे विभाग २ चे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे आणि उपअभियंता बबन वाळके यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेतले.

खरातवाडी आणि परिसरातील शेती प्रामुख्याने कुकडी डाव्या कालव्यावर अवलंबून आहे. मात्र, कालवा कार्यान्वित झाल्यापासून सुरू असणारी डीवाई ८ चारीची सब मायनर पोटचारी क्रमांक १ काही शेतकऱ्यांनी बेकायदेशीरपणे बंद केली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी प्रत्येक रोटेशनला पाण्यापासून वंचित राहत असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यावर तांत्रिक तोडगा म्हणून पोलीस बंदोबस्तात या चारीचे काम तातडीने पूर्ण करावे, ही आंदोलकांची मुख्य मागणी होती. यासोबतच, हंगा डीओ या ठिकाणी कायमस्वरूपी लोखंडी पक्के गेट बसवावे आणि संपूर्ण नादुरुस्त व गळती झालेली मायनर चारी क्रमांक ४५ तातडीने दुरुस्त करावी, या मागण्यांसाठी सकाळी सुभाष पंदरकर, दत्तात्रय पंदरकर, आनंता कदम, शिवाजी भोर, रंगनाथ कदम, सुभाष गलबले, गणपत गलबले, गणपत नलगे, अमोल पंदरकर, शिवाजी भापकर, युवराज भापकर, सुदाम रणसिंग आणि पिंटू नलगे यांच्यासह अनेक शेतकरी उपोषणाला बसले होते. पिंपळगाव खरातवाडीचे माजी सरपंच सूर्यजीत पवार, माजी उपसरपंच लक्ष्मण इथापे आणि नाना इथापे यांनीही उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.

शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत सकारात्मक चर्चा केली. कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले की, मायनर १ व मायनर ४५ या चाऱ्यांच्या तांत्रिक कामाबाबत यांत्रिकी विभागाला तातडीने आदेश देण्यात आले आहेत. लवकरच या दोन्ही चाऱ्यांचे काम पूर्ण करून पुढील आवर्तनाचे पाणी शेतकऱ्यांना या चाऱ्यांद्वारे थेट उपलब्ध करून दिले जाईल. तसेच, हंगा डीओच्या लोखंडी गेटचे कामही विनाविलंब पूर्ण केले जाईल. प्रशासनाने पाण्याच्या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन सकारात्मक कायदेशीर निर्णय घेतल्याबद्दल मारुती भापकर आणि उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले.


  • Labels: Shrigonda Farmers Agitation, Kukdi Canal Water Dispute, Maruti Bhapkar Fast, Ahilyanagar Irrigational Issues, Kharatwadi Farmers Protest

  • Search Description: Farmers of Kharatwadi, led by Maruti Bhapkar, staged an indefinite fast at Shrigonda Tehsil office over Kukdi canal water share, ending it after a written assurance from irrigation officials.

  • Hashtags: #ShrigondaNews #FarmersProtest #KukdiCanal #WaterCrisis #Ahilyanagar #AstraNewsNetwork

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा