पिंपरी/पुणे, दि. ३१ मे २०२६ (विशेष प्रतिनिधी): मराठी चित्रपटसृष्टीचा सर्वांगीण विकास आणि कलाकारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत 'समर्थ पॅनल'च्या सर्व अधिकृत उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे. महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी येत्या ७ जून रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी पिंपरी येथे एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी चित्रपटसृष्टीचे हित समोर ठेवून भाऊसाहेब भोईर यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेत, निर्माता गटाचे दुसरे उमेदवार सुनील महाजन यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे निवडणुकीत समर्थ पॅनलचे पारडे कमालीचे जड झाले आहे.
या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला समर्थ पॅनलचे प्रमुख आणि निर्माता पदाचे अधिकृत उमेदवार मेघराज राजे भोसले, सुनील महाजन, दिग्दर्शक पदाचे उमेदवार अजित शिरोळे, लेखक पदाचे उमेदवार राज काझी यांच्यासह गौरी लोंढे, संजय ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते. नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तंत्रज्ञ व कामगारांचे प्रश्न सोडवणे आणि चित्रपटसृष्टीतील सर्व घटकांना एकत्रितपणे पुढे नेण्यासाठी समर्थ पॅनल कटिबद्ध राहील, असा विश्वास या वेळी नेत्यांनी व्यक्त केला. भाऊसाहेब भोईर यांच्यासारख्या उत्तुंग आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाने दिलेल्या पाठिंब्यामुळे चित्रपट महामंडळात परिवर्तनाची लाट येईल, असा आशावाद या वेळी व्यक्त करण्यात आला.
पॅनल प्रमुख मेघराज राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, "कलाकारांचा सन्मान – मराठी सिनेसृष्टीचा विकास" हे ब्रीदवाक्य घेऊन आमचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि कामगारांना न्याय देणारे प्रभावी नेतृत्व देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या वेळी त्यांनी अधिकृत उमेदवारांची घोषणा करताना सभासदांना 'पतंग' या चिन्हाोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
समर्थ पॅनलच्या अधिकृत उमेदवारांमध्ये चित्रपटसृष्टीतील नामांकित दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये चित्रपट निर्माता गटातून मेघराज राजे भोसले आणि सुनील महाजन, दिग्दर्शक पदासाठी दीपक कदम (मुंबई), अभिनेता पदासाठी सुशांत शेलार (मुंबई), छायाचित्रण पदासाठी धनाजी यमकर (कोल्हापूर), नृत्य पदासाठी सुभाष नकाशे (मुंबई), ध्वनी पदासाठी शरद चव्हाण (कोल्हापूर), कलादिग्दर्शक पदासाठी प्रवीण (वासू) पाटील (सातारा), वेशभूषा पदासाठी चैत्राली डोंगरे (मुंबई), निर्मिती व्यवस्था पदासाठी रवी गावडे (कोल्हापूर), प्रसिद्धी पदासाठी गणेश गारगोटे (मुंबई) आणि कामगार पदासाठी विकास तोरणे (कोल्हापूर) निवडणूक लढवत आहेत. डिजिटल माध्यमांशी सुसंगत धोरणे राबवून महामंडळाचा कारभार अधिक पारदर्शक आणि सक्षम बनवण्याचे आश्वासन सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी दिले.
Labels
Marathi Chitrapat Mahamandal Election, Samarth Panel Meghraj Bhosle, Bhausaheb Bhoir Support, Sushant Shelar Actor, Kolhapur Mumbai Film Industry, Pune Press Conference
Search Description
Bhausaheb Bhoir withdraws his nomination and extends full support to Meghraj Raje Bhosle's Samarth Panel for the upcoming Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal Elections 2026. Voting on June 7.
Hashtags
#ChitrapatMahamandal #SamarthPanel #MeghrajBhosle #BhausahebBhoir #SushantShelar #MarathiCinema #MarathiNews #BreakingNews #PuneNews
Reviewed by ANN news network
on
५/३१/२०२६ ०४:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: