शनिवार, २३ मे, २०२६

चुकीच्या 'इ-चलन' कारवाईविरोधात बस मालक आक्रमक; पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचा एल्गार

 


 आरटीओ नियम पाळा, पण चुकीची कारवाई थांबवा! बस ओनर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत तीव्र नाराजी

पिंपरी, २३ मे २०२६: चुकीच्या पद्धतीने आणि सरसकट होणाऱ्या 'इ-चलन' कारवाईतून ट्रॅव्हल्स व वाहतूकदारांची तात्काळ मुक्तता न केल्यास, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी दिला आहे. शुक्रवार, २२ मे रोजी पिंपरी येथे आयोजित असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करून आणि मुंबईतील आझाद मैदान तसेच पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलने करूनही अद्याप या समस्येवर कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने वाहतूकदारांमध्ये तीव्र संताप आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेला पिंपरी चिंचवडचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO) पवन नवादे, महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी, बोकी वेस्ट झोनचे उपाध्यक्ष किरण देसाई, पुणे बस असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, कार्याध्यक्ष दीपक कलापुरे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुणे बस असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी वाहतूक व्यवसायापुढील आर्थिक संकटांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "नवीन युरो सिक्स (Euro 6) तंत्रज्ञानावर आधारित वाहनांमुळे देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमालीचा वाढला आहे, मात्र त्या तुलनेत व्यावसायिकांचे उत्पन्न वाढलेले नाही. या नवीन तंत्रज्ञानामुळे गाड्या रस्त्यात 'ब्रेक डाऊन' होण्याचे प्रमाण वाढले असून, टायर आणि स्पेअर पार्टच्या वाढत्या किमतींमुळे बस मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत." सरकारने या महागाईवर नियंत्रण आणून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तर, जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीचा उल्लेख करत किरण देसाई यांनी भविष्यात पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी संघटनेची एकता महत्त्वाची असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित एआरटीओ पवन नवादे यांनी आरटीओकडून बस चालकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध माहितीपर उपक्रमांची माहिती दिली, तसेच सर्व बस मालकांनी वाहतुकीचे नियम आणि कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले. या सभेला टाटा मोटर्स, अशोक लेलँड आणि व्ही. ई. कमर्शियल व्हेईकल या कंपन्यांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले. कार्यक्रमाचे स्वागत दीपक कलापुरे यांनी केले, सूत्रसंचालन तेजस्विनी लोकरे यांनी केले, तर आभार बाळासाहेब बोराटे यांनी मानले. सभेच्या समारोप सत्रात संगीत कार्यक्रम आणि लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.


  • Labels: Pimpri Chinchwad, Bus Owners Association, E-Challan Protest, RTO Pune, Maharashtra Transport News, Travel Business Crisis

  • Search Description: Pimpri Chinchwad Bus Owners Association president Dattatray Bhegde warns Maharashtra government of massive protests if wrong E-Challan actions against private buses are not stopped immediately.

  • Hashtags: #EChallanProtest #BusOwnersAssociation #PimpriChinchwad #RTO #MaharashtraTransport #TravelBusiness #DattatrayBhegde

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा