बुधवार, २० मे, २०२६

"पवारांशी असहमत असणारे राऊत उद्या ठाकरेंसोबतही गद्दारी करतील"; भाजपाचा संजय राऊतांवर थेट प्रहार

 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे कौतुक करणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मताशी असहमत असणारे संजय राऊत हे भविष्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही विरोधात जायला मागे-पुढे पाहणार नाहीत. राहुल गांधींची चाकरी करण्यासाठी आणि 'उबाठा' (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला खड्ड्यात घालण्यासाठी त्यांनी काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे, असा घणाघाती आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी येथे केला. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या संवाद शैलीवर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पळ काढणारे नाहीत तर देशाचे खंबीर नेतृत्व करणारे आहेत. याउलट, अडीच वर्षे सत्ता मिळाल्यानंतर पळ काढून घरात बसणारे उद्धव ठाकरे होते, तर पत्राचाळ घोटाळ्यात अटक झाल्यानंतर पळ काढणारे संजय राऊत होते. विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करूनही पळ काढणाऱ्या उद्धव ठाकरेंचा आणि उबाठा गटाचा पळपुटेपणा महाराष्ट्राने वारंवार पाहिला आहे. नरेंद्र मोदींच्या सक्षमतेमुळेच जनतेने त्यांना सलग तीन वेळा पंतप्रधानपदी निवडून दिले असून, ते 'मन की बात' व विविध माध्यमांतून जनतेशी थेट संवाद साधतात. राऊतांसारख्या मध्यस्थाची त्यांना गरज नाही, असेही त्यांनी सुनावले.

ठाकरे सरकारने प्रकल्प गुंडाळले, फडणवीसांनी विकास केला! 

महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) करत असल्याचे स्पष्ट करत बन यांनी ठाकरे सरकारच्या कार्यकाळावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई मेट्रो, रिफायनरी आणि अणुऊर्जा प्रकल्पासारखे महत्त्वाचे प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवण्याचे पाप केले. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक (FDI) झाली. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागाचा औद्योगिक कायापालट झाला असून, आता रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये रिफायनरी प्रकल्प येत आहेत.

भाजपा विकासासाठी कटिबद्ध

"घरात बसून काम करणे किंवा प्रकल्पांना आडकाठी आणून शेतकऱ्यांची फसवणूक करणे हा भाजपाचा किंवा देवाभाऊंचा धंदा नाही," अशा कडक शब्दांत नवनाथ बन यांनी विरोधकांना लक्ष्य केले. मुंबईचा मेट्रो प्रकल्प असो, अणुऊर्जा प्रकल्प असो की गडचिरोलीतील पोलाद कारखाना, भाजपा सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असून त्यादृष्टीने सातत्याने पावले टाकली जात असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.


  • Labels: Maharashtra Politics, BJP Maharashtra, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Navnath Ban, Devendra Fadnavis, Political Controversy

  • Search Description: BJP State Chief Spokesperson Navnath Ban slammed Sanjay Raut, claiming he has taken a contract from Congress to ruin the Uddhav Thackeray faction (UBT) and will soon turn against them.

  • Hashtags: #MaharashtraPolitics #SanjayRaut #NavnathBan #BJPShivSena #DevendraFadnavis #UddhavThackeray #MumbaiNews

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा