"बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या वाझेचे समर्थन करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कधी प्रश्न विचारलात का?" – भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना खडा सवाल
मुंबई, दि. ३० मे २०२६ (विशेष प्रतिनिधी): "‘गुन्हेगारांनो भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे’, ही मूळ टॅगलाईन उद्धव ठाकरे यांची होती हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असावेत. पुण्यात घडलेल्या विषारी दारू प्रकरणी पोलिसांनी तातडीने मुख्य आरोपींवर कठोर कारवाई केली असून दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची राजकीय हिंमत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिली आहे. याउलट, स्वतः मुख्यमंत्री असताना 'सचिन वाझे काय लादेन आहे का?' असे म्हणत अँटिलिया बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे जाहीर समर्थन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना एका वाक्याने तरी प्रश्न विचारण्याची हिंमत तुम्ही कधी दाखवली का?" असा थेट आणि खडा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आज उपस्थित केला. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदांवर कडाडून टीका केली. राज्यातील अवैध दारूचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे काम पोलीस दल अत्यंत प्रभावीपणे करत असताना, राऊत केवळ प्रसिद्धीसाठी वायफळ बडबड करत असल्याचा आरोप त्यांनी केला. "संजय राऊत यांनी पुरावे नसलेले आरोप करण्यापेक्षा कोणत्या आमदाराचे अवैध दारूचे धंदे आहेत, त्यांची नावे उद्या सकाळीच जाहीर करावीत. जर प्रामाणिकपणे शोध घेतला, तर सर्वाधिक अवैध दारूवाले हे महाविकास आघाडीचे आणि राऊतांचेच समर्थक सापडतील," असे आव्हानही त्यांनी दिले.
याच पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी आगामी विधान परिषद निवडणुकांवरून महाविकास आघाडीची कोंडी केली. महाविकास आघाडीने १७ जागांवर कितीही उमेदवार उभे केले, तरी या निवडणुकीत महायुती '१७ विरुद्ध शून्य' अशा दणदणीत फरकाने ऐतिहासिक विजय मिळवेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांवर उपरोधिक टीका करताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला पूर्णपणे नाकारले असल्याने त्यांनी नांदेड, हिंगोली किंवा थेट न्यूयॉर्कवर दावे केले तरी काही फरक पडणार नाही. त्यांची प्रशंसा केवळ लाहोर, रावळपिंडी किंवा कराचीतच होऊ शकते, त्यामुळे त्यांनी तिथल्याच निवडणुकांची चिंता करावी, असा टोला त्यांनी लगावला.
शेवटी, राज्यातील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नवनाथ बन यांनी महायुती सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. "मराठा समाजाला कायदेशीर आणि टिकणारे १० टक्के आरक्षण देण्याचे ऐतिहासिक काम केवळ देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने केले आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारला मराठा समाजाबद्दल आदर नव्हता," असे सांगत त्यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली. सध्या मराठवाड्यात ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असल्याने जरांगे यांनी उपोषण करून स्वतःला आणि समाजबांधवांना त्रास देऊ नये, सरकार त्यांच्या प्रत्येक कायदेशीर मागणीवर सकारात्मक चर्चेसाठी सदैव तयार आहे, असे आवाहन करत त्यांनी पत्रकार परिषदेचा समारोप केला.
Labels
Navnath Ban BJP, Sanjay Raut Controversy, Uddhav Thackeray Sachin Vaze, Pune Toxic Liquor Issue, Maharashtra Legislative Council Election, Maratha Reservation Update
Search Description
BJP State Main Spokesperson Navnath Ban slammed Sanjay Raut over his allegations on the Pune liquor case. Ban questioned whether Raut ever interrogated Uddhav Thackeray for supporting bomb plot suspect Sachin Vaze during his tenure. Ban also claimed Mahayuti will win the MLC elections 17-0.
Hashtags
#NavnathBan #SanjayRaut #BJPUnion #UddhavThackeray #PuneLiquorTragedy #MLCElections2026 #MarathaReservation #BreakingNews
Reviewed by ANN news network
on
५/३०/२०२६ ०१:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: