पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांमध्ये १९ एप्रिल २०२६ रोजी दाखल झालेले गुन्हे
शेतीच्या वादातून महिलेला मारहाण; खेडमधील घटना
**खेड:** शेतीच्या जुन्या वादातून आणि पाईपलाईन फोडण्याच्या कारणावरून विचारणा केली असता, एका महिलेला अश्लील शिवीगाळ करत दगडाने व बुक्क्याने मारहाण केल्याची घटना खेड तालुक्यातील चोघेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात समीर लक्ष्मण चोघे (वय २९, रा. चोघेवाडी, पाईट, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या राहत्या घराजवळ असताना हा प्रकार घडला. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून शेतीचा वाद आहे. 'तू पाईपलाईन का फोडणार आहेस?' अशी विचारणा फिर्यादीने केली असता, आरोपी समीर याने रागाच्या भरात त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने, बुक्क्याने आणि दगडाने मारहाण करून दुखापत केली. इतकेच नव्हे तर जिवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर पिडीत महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलीस हवालदार दिघे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
चिखलीत व्यापाऱ्याला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत ७ लाखांची लूट
**चिखली:** जुन्या व्यवहाराचे पैसे मिळाले नसल्याचे सांगत एका व्यापाऱ्याला धमकावून त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ९ हजार ९०० रुपये, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि मोबाईल फोन उकळल्याचा धक्कादायक प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कैलास भास्कर चौधरी (वय ४७, रा. तळवडे) यांनी तक्रार दिली असून, सचिन उर्फ तानाजी नायकुडे (रा. रुपीनगर, तळवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चौधरी यांनी २०१५ मध्ये संगिता होलमाने यांच्याकडून घेतलेले पैसे परत केले होते. मात्र, आरोपी सचिन याने 'ते पैसे मला मिळाले नाहीत, तू मला पैसे दे' असे म्हणून धमकावण्यास सुरुवात केली. 'पैसे दिले नाहीस तर तुझे दुकान बंद पाडेन, दुकानात गांजा आणून ठेवून तुला जेलमध्ये पाठवीन' अशी धमकी त्याने दिली. या भीतीपोटी फिर्यादीने वेळोवेळी आरोपीला रोख रक्कम, फोन आणि अंगठी दिली. आता आरोपी पुन्हा १ लाख ७० हजार रुपयांची मागणी करत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी; रावेतमध्ये सायबर गुन्हेगाराला बेड्या
**रावेत:** फिर्यादीची होणारी पत्नी आणि तिच्या आईचे मॉर्फ केलेले नग्न फोटो सोशल मीडियावर आणि विविध अश्लील संकेतस्थळांवर अपलोड करून ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. ऋषीकेश भाऊसाहेब शिंदे (रा. हिंजवडी फेज-३, मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ते १८ एप्रिल दरम्यान आरोपीने फिर्यादी, त्यांची होणारी पत्नी आणि मित्रांना वेगवेगळ्या क्रमांकावरून नग्न फोटो पाठवले. हे फोटो त्याने 'Pornhub' सारख्या साईट्सवर अपलोड केले होते. 'हे फोटो काढून टाकण्यासाठी ५ लाख रुपये दे' अशी मागणी त्याने केली होती. या मानसिक त्रासाला कंटाळून पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ऋषीकेश शिंदे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक टार्फे पुढील तपास करत आहेत.
आळंदीतील 'आराम लॉज'वर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
**दिघी:** आळंदी देवाची येथील देहूफाटा परिसरात असलेल्या 'आराम लॉज'वर दिघी पोलिसांनी छापा टाकून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पीडित महिलांची सुटका केली असून गणेश बाबाजी डुंबरे (वय ३२, रा. आळंदी) याला अटक केली आहे, तर विजय गणेश शेट्टी हा फरार झाला आहे.
१९ एप्रिल रोजी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना कामाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. पोलीस हवालदार अरुण खंडू डामसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी १५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंगारे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
काळेवाडीतील बापूजीबुवा मंदिरात चोरी; पर्समधून सोन्याची पोत लंपास
**काळेवाडी:** थेरगाव येथील बापूजीबुवा मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेची पर्स कापून त्यातील २५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरज सुरेश खाडे (वय २७, रा. अहमदनगर) आणि रावसाहेब साहेबराव जाधव (वय ५०, रा. धाराशिव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी नागिनी सिद्धेश्वर तांभाळे (वय ४०, रा. थेरगाव) या १८ एप्रिल रोजी रात्री ८:३० च्या सुमारास मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी आपसात संगनमत करून गर्दीत त्यांच्या पर्सला काप मारला आणि ५ ग्रॅम वजनाची काळ्या मण्यातील सोन्याची पोत चोरून नेली. फिर्यादीच्या तक्रारीनंतर काळेवाडी पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण पुढील तपास करत आहेत.
तापकीर मळा परिसरात शस्त्र घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
**काळेवाडी:** शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू असताना बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. आशिष एकनाथ शेटे (वय २६, रा. रहाटणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१८ एप्रिल रोजी रात्री ८:४१ च्या सुमारास काळेवाडीतील तापकीर मळा येथील मोकळ्या जागेत आरोपी संशयास्पदरीत्या थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीची एक देशी बनावटीची लोखंडी पिस्टल आणि २ हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलीस आयुक्त यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण या गुन्ह्याचा तपास करत आहेत
मारुंजी रोडवर हॉटेलसमोर सशस्त्र गुन्हेगाराला पकडले; हिंजवडी पोलिसांची कारवाई
**हिंजवडी:** मारुंजी रोडवरील फलो हॉटेलसमोर सार्वजनिक रस्त्यावर बेकायदा गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. राकेश वासुदेव येवले (वय ३४, रा. कान्हेवाडी, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
१९ एप्रिल रोजी रात्री ७:२० च्या सुमारास हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली. गस्तीवर असताना पोलिसांना आरोपीकडे शस्त्र असल्याची माहिती मिळाली. त्याची झडती घेतली असता ३५ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल आणि १ हजार रुपयांचे जिवंत काडतूस मिळून आले. आरोपीने कोणत्याही परवान्याशिवाय हे शस्त्र बाळगल्याने त्याच्यावर हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
चाकणच्या समर्थ इंडस्ट्रीत भीषण अपघात; मशिनमध्ये हात अडकून कामगार गंभीर जखमी
**चाकण:** नवीन प्लॅन्टमधील डायकास्टिंग मशिनवर काम करण्याचा अनुभव नसतानाही सक्तीने कामावर लावल्यामुळे एका कामगाराचा डावा हात मशिनमध्ये चिरडला गेल्याची धक्कादायक घटना चाकण येथील समर्थ इंडस्ट्री कंपनीत घडली आहे. याप्रकरणी कंपनीचे विभाग प्रमुख चौधरी यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तात्या रामा चव्हाण (वय ४१, रा. चाकण) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना मशिनचा अनुभव नसतानाही विभाग प्रमुखांनी त्यांना काम करण्यास सांगितले. काम करत असताना मशिनच्या डायमधील कचरा काढताना अचानक मशिन बंद झाली (डाय क्लोज झाली) आणि त्यात फिर्यादीचा डावा हात मनगटापासून पुढे चिरडला गेला. यात त्यांच्या पाचही बोटांचे हाडे फॅक्चर होऊन पंजाचा चंदा-मेदा झाला आहे. या गंभीर अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी विभाग प्रमुखावर गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.
महाळुंगे एमआयडीसी परिसरात 'कल्याण मटका' अड्ड्यावर पोलिसांचा छापा
**महाळुंगे:** येलवाडी येथील शिवमल्हार चायनीज सेंटरच्या परिसरात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुरज मुरलीधर गाडे (वय २८, रा. गहुंजे) आणि दिनेश वरसु चव्हाण (वय ४०, रा. देहूगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
१९ एप्रिल रोजी सायंकाळी ५:१० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळवत असताना रंगेहाथ मिळून आले. पोलिसांच्या पथकाने २,७२० रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र खेडकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून पोलीस शिपाई जगताप पुढील तपास करत आहेत.
उर्से येथे पत्त्यांच्या जुगारावर पोलिसांची कारवाई; चौघांविरुद्ध गुन्हा
**शिरगाव:** मावळ तालुक्यातील उर्से येथे जयहिंद कंपनीसमोर मोकळ्या जागेत पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या चार जणांवर शिरगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. हनुमंत विश्वनाथ पवळ, समाधान केरप्पा दूधभाते, वैजीनाथ पंडा दूधभाते आणि सुनील मास्ती लोखंडे (सर्व रा. उर्से, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
१९ एप्रिल रोजी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदा विनापरवाना तीन पाने पत्त्याचा जुगार खेळत असताना पोलिसांना मिळून आले. त्यांच्याकडून १,८३० रुपयांची रोख रक्कम आणि पत्त्याची पाने जप्त करण्यात आली आहेत. पोलीस कॉन्स्टेबल रोशन डोंगरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून पोलीस हवालदार सोनटक्के तपास करत आहेत.
शिरगावमध्ये हातभट्टी दारूसाठीचे १५ हजार लिटर रसायन जप्त; ५ लाखांचा मुद्देमाल नष्ट
**शिरगाव:** शिरगाव गावच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत बेकायदा हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले १५ हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन शिरगाव पोलिसांनी जप्त केले आहे. या रसायनाची किंमत सुमारे ५ लाख २५ हजार रुपये असून पोलिसांनी सर्व मुद्देमाल नष्ट केला आहे.
१९ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. एका महिला आरोपीने सुरेश गायकवाड यांच्या शेताच्या बाजूला हा दारूचा अड्डा सुरू केला होता. पोलीस कॉन्स्टेबल सागर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मुल्ला या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कारचे हप्ते थकल्याने रिकव्हरी एजंट्सचा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला
**भोसरी:** कारचे हप्ते भरले नसल्याच्या कारणावरून रिकव्हरी एजंट्सनी एका शेतकऱ्याची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ करत चाकूने मारहाण केल्याची घटना पुणे-नाशिक हायवेवरील शिवाजीवाडी चौकात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
प्रकाश तानाजी जाधव (वय २५), दत्ता पुरुषोत्तम कल्याणी (वय ३०) आणि सूरज तुकाराम कुसाळकर (वय २५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी संदीप सोपान कड (वय ३८, रा. वाकी बुद्रुक) हे त्यांच्या चारचाकीतून जात असताना आरोपींनी आपली दुचाकी आडवी लावून त्यांना थांबवले. गाडीचे हप्ते का भरले नाहीत, अशी विचारणा करत त्यांनी गाडीची काच फोडली आणि संदीप यांच्या उजव्या दंडावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस फौजदार जाधव पुढील तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा