६० कोटींचा बोगस उपसूचना घोटाळा; आप युवक आघाडीचा कारवाईचा इशारा
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील तब्बल ६० कोटी रुपयांच्या बोगस उपसूचना घोटाळ्याने नवे वळण घेतले आहे. या प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी शुक्रवारी, १७ एप्रिल रोजी दक्षता विभागाला पत्र लिहून संबंधित सर्व अभियंत्यांनाही जबाबदार धरण्याची मागणी केली आहे. ही महत्वाची घडामोड होत असतानाच आम आदमी पक्षाने आता या प्रकरणाविरोधात आवाज उठवण्याचे ठरविले आहे. आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी दोषी नगरसेवक, अधिकारी आणि कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
चौकशी समितीच्या अहवालानुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या प्रकरण ९ अंतर्गत कलम ८४(२), ८६, ८७ आणि १०३ नुसार अर्थसंकल्पीय निधीतून खर्च करणे, रक्कम कमी करणे किंवा हस्तांतरित करणे यासाठी स्थायी समिती अथवा महापालिका सभेची पूर्वमान्यता घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र या प्रकरणातील १४ उपसूचनांच्या बाबतीत अशी कोणतीही नियमानुसार कार्यवाही झाली नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. या नियमबाह्य उपसूचनांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची बिले थेट कंत्राटदारांना अदा करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी दक्षता विभागाला लिहिलेल्या पत्रात ज्या विभागांशी संबंधित उपसूचना तयार केल्या गेल्या आणि बिले निर्माण करण्यात आली, त्या सर्व विभागांतील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता आणि सहशहर अभियंता यांनाही या घोटाळ्यास जबाबदार धरण्यात यावे, असे नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी विस्तारली असून अनेक उच्चपदस्थ अधिकारी आता संशयाच्या घेऱ्यात आले आहेत.
या प्रकरणी रविराज काळे यांनी प्रशासनाकडे चार ठोस मागण्या मांडल्या आहेत. बोगस बिले तयार करण्यात सहभागी झालेल्या सर्व अभियंत्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, १४ बोगस उपसूचनांवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करून त्यांचे पद रद्द करावे, कंत्राटदारांना अदा केलेली रक्कम वसूल करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, तसेच या संपूर्ण घोटाळ्यातील सर्व दोषींवर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, अशा त्यांच्या मागण्या आहेत.
प्रवीण जैन यांच्यासह संबंधित अधिकारी, नगरसेवक आणि कंत्राटदार यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टीची युवक आघाडी तीव्र आंदोलन करेल, असा स्पष्ट इशारा रविराज काळे यांनी प्रशासनाला दिला आहे. हा घोटाळा महानगरपालिकेच्या तिजोरीवर थेट घाला घालणारा असून सामान्य करदात्यांच्या पैशांची अशा प्रकारे लूट होणे अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
Labels
Municipal Scam · Bogus Sub-Proposals · AAP Maharashtra · Civic Corruption · Raviraaj Kale · Praveen Jain · Local Governance · Maharashtra Politics
Search Description
A massive ₹60 crore municipal scam involving 14 bogus sub-proposals has come to light, with bills illegally paid to contractors without mandatory approval from the Standing Committee. AAP Maharashtra Youth Wing president Raviraaj Kale has demanded immediate suspension of engineers, cancellation of councillors' posts, and criminal action against all accused, warning of agitation if authorities fail to act.
Hashtags
#MunicipalScam #BogusSubProposals #60CroreScam #AAPMaharashtra #RaviraajKale #PraveenJain #CivicCorruption #Maharashtra #AntiCorruption #MaharashtraPolitics #NagarSevak #मराठीबातमी #भ्रष्टाचार #महानगरपालिका
Reviewed by ANN news network
on
४/२८/२०२६ १२:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: