१९ नर्मदा परिक्रमा : टीबी गावातील मुक्काम

 


टीबी गावातील मुक्काम

३१ डिसेंबर २०२४ या वर्षअखेरच्या दिवशी सकाळी आम्ही रहियादहून बाहेर पडलो आणि चालायला सुरुवात केली. रस्त्यात एका ठिकाणी दोन तरुण टेबल लावून परिक्रमावासींना चहा पाजत होते. त्यांच्याकडून चायप्रसादीचा स्वीकार करून आम्ही पुढे निघालो.

चालत चालत आम्ही कलादरा येथे पोहोचलो आणि रात्री कपातेश्वर महादेव मंदिराच्या आश्रमात मुक्काम केला.

अप्सरेश्वराचे दर्शन

सकाळी कलादराहून बाहेर पडलो. थंडी चांगलीच होती. पुढे एकसाल या गावात पोहोचलो. तेथे अप्सरेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात तपश्चर्या करून अप्सरांनी महादेवाला प्रसन्न करून घेतल्याची आख्यायिका आहे. मंदिरात शांतता होती. आम्ही तिथे टेकलो. बाथरूमला भरपूर पाणी असल्याने कपडे धुवून टाकले.

तोपर्यंत गावातून एक सेवेकरी आले. त्यांनी परिक्रमावासी आल्याचे पाहताच तातडीने गावात कॉल केला. पुढच्या दहा-पंधरा मिनिटांत आणखी दोन सेवेकरी येऊन हजर झाले. त्यांनी सोबत मोठी पपई आणि पोह्यांचे साहित्य आणले होते. त्यांनी आम्हाला पपई चिरून दिली आणि गरमागरम पोहे चहा देखील तयार करून दिला. त्याचा स्वीकार करून आम्ही त्यांना नर्मदे हर करत पुढे चालू लागलो.

आतापर्यंत सुमारे १४ किलोमीटरची रपेट झाली होती. त्यानंतर आम्ही भारभूत या पुरातन गावात पोहोचलो. तिथे भारेश्वर महादेव तीर्थ, दत्त मंदिर आणि अन्नक्षेत्र आहे. आम्ही केवट आश्रमात भोजन प्रसादी घेतली आणि पुढे चालू लागलो. पुढचा रस्ता मैयाच्या किनाऱ्यानेच होता, त्यामुळे चालण्याचा शीण नाहीसा झाला.

उपेक्षित सुवर्णबिंदुकेश्वर

संध्याकाळ होत आली होती. आम्ही मैयाचा किनारा सोडून वरती जाणाऱ्या एका पायवाटेने वर चढलो. ते टीबी नावाचे गाव होते. वरती जाताच एक शिवमंदिर आणि छोटासा आश्रम होता. तेथील महाराजांनी आम्हाला थांबण्याची सूचना केली. त्यांनी पूर्वी मुंबईत मार्केटिंगमध्ये नोकरी केली होती आणि आता ते अध्यात्मात रमले होते.

खरेतर इथून सुमारे २०० मीटर अंतरावर सुवर्णबिंदुकेश्वर नावाचे एक पुरातन तीर्थ आहे, पण तेथे सर्व मंदिरांना कुलूप लागलेले होते. झाडीझुडपे सर्वत्र वाढलेली होती आणि ओसाड अवस्थेत हे तीर्थ पडलेले होते. त्याची अवस्था पाहून आम्हाला खूप वाईट वाटले.

रात्री सायंपूजा झाल्यावर महाराजांनी स्वतःच्या हाताने छानसा स्वयंपाक करून आम्हाला जेवण वाढले. दुसऱ्या दिवशी सकाळी तर आमच्यासाठी चैनच होती. आंघोळीला गरम पाणी, त्यात गुलाब पाणी मिसळलेले... एकूणच शाही थाट! आंघोळ आणि पूजा झाल्यावर पुन्हा चहा, नाश्ता आणि त्यावर पपई असा भरपेट नाश्ता झाला.

भरूच: अचानक आजारपण

त्या महाराजांना नर्मदे हर करून आम्ही तिथून बाहेर पडलो. इथून सुमारे दीड-दोन किलोमीटरवर दशान नावाचे गाव आहे, जिथे दशकन्येश्वर महादेव तीर्थ आहे. या मार्गावर भरूचजवळ नवले महाराजांना मळमळू लागले आणि मोठ्या प्रमाणावर उलट्या सुरू झाल्या. सुदैवाने पुढे काही अंतरावर भरूच गाव होते, त्यामुळे औषधे मिळण्याची शक्यता होती.

आम्ही कसेतरी बसत उठत भरूचमधील कामनाथ मंदिरात जाऊन आसन लावले. भरूच हे प्राचीन गाव आहे. त्याचे जुने नाव भृगुक्षेत्र असे आहे आणि या गावात एकूण ४८ तीर्थे आहेत.

नवले महाराज आराम करत असताना मी डॉक्टरांना कॉल करून त्यांची स्थिती सांगितली आणि औषधे घेऊन आलो. सत्संगी महाराज त्यांच्या कामाला गेले होते. औषधे दिल्यावर साधारण अर्ध्या पाऊण तासात नवले महाराजांच्या उलट्या बंद झाल्या, पण अशक्तपणा होता. कोणत्याही परिस्थितीत आपल्याबरोबरच्या परिक्रमावासीला आजारी असताना सोडून जायचे नाही, या विचाराने आम्ही जरूर तर भरूचमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला.

या दरम्यान, मी आणि सत्संगी महाराज आश्रमापासून चार-पाच किलोमीटर दूर दशाश्वमेध घाटावर जाऊन दर्शन घेतले. या ठिकाणी तळघरात एक दत्तमूर्ती आहे, जिथे रंगावधूत स्वामींनी चातुर्मास केला होता. पुजाऱ्याने आम्हाला तिथे जाऊन दर्शन घेऊ दिले. आम्ही  नंतर भृगऋषीं आश्रमात गेलो.

परत येताना भरूचची मोठी बाजारपेठ लागली. हजारो वर्षांचा इतिहास असलेले हे शहर विदेशाशी व्यापार करणारे होते. शहरात अनेक पुरातन हवेल्या दिसतात.

केमिकल लोचा?

आश्रमात परतलो तोपर्यंत नवले महाराजांची तब्येत बऱ्यापैकी सुधारली. आणि सत्संगी महाराजांची कुरकुर सुरू झाली. पाय दुखतोय... उद्या इथेच मुक्काम करूया.. आताशा त्यांच्या वागण्यात हट्टीपणा आणि विक्षिप्तपणा वाढत चालला होता. केव्हा कसे वागतील, काय बोलतील ते सांगता येत नसे. त्यात भगवे कपडे घातलेला किंवा जटा वाढवलेला, दाढी ठेवलेला एखादा प्राणी दिसला की त्याच्या भजनी लागायचे. त्याच्याकडे अक्षरश: ढसढसा रडायचे. तो जे काही सांगेल त्याचा आपल्या मनाप्रमाणे अर्थ काढायचे आणि काहीतरी विचित्र वागायचे. मध्येच आक्रस्ताळेपणा करायचे. एखाद्याला आपला मोबाईल नंबर द्यायचे आणि म्हणायचे गरज लागली तर या भिकारयाला रात्री बारा वाजता फ़ोन करा. पाच मिनिटात तुमचा प्रश्न सोडवून टाकेन. मात्र, यांचा मोबाईल कायम बंद करून ठेवलेला असायचा. मागे धडगावच्या महाराजांना आणि आता टीबीच्या महाराजांना असा नंबर देऊन झाला होता. त्या महाराजांचे मला कॊल येत होते. मी महिन्यातून एकदाच घरी आईशी बोलणार असे ते सांगायचे. एकदा ते त्यांच्या आईशी बोलताना आईने फ़ोन तुझ्याबरोबरच्या परिक्रमावासीकडे दे असे म्हटले. तेव्हा काही बोलू नको असे खुणावून त्यांनी मोबाईल माझ्याकडे दिला तेव्हा त्यांच्या आईने किमान आठवड्यातून एकदा तरी त्याला कॊल करायला लावा असे मला सांगितले. मात्र, परिक्रमेत कोणतीही वृद्ध स्त्री भेटली की आईए... आईए. असे करून तिला गळामिठी घालत ढसढसा रडायचे. त्यामुळे या विषयाची विनाकारण चर्चा व्हायची.इतर परिक्रमावासी आम्हाला विचारायचे काय झाले? मग आम्ही ते आमच्याबरोबर आलेले नाहीत. वाटेत भेटले आहेत. आम्हाला अधिक माहिती नाही असे सांगून विषय संपवत असू.कुछ तो केमिकल लोचा है! हे मात्र, आता जाणवू लागले होते. त्यांचा एक गुण मात्र  चांगला होता. जिथे जातील तिथे स्वत: पटकन झाडलोट करायचे.

तर;  पुन्हा मूळ विषयाकडे वळू....नवले महाराजांना जेवणाची इच्छा नव्हती. पण; पोट रिकामे राहिले तर पुन्हा पित्त वाढून त्रास होईल म्हणून थोडेतरी खा असे त्यांना सांगितले. मग, त्यांनी थोडीशी भोजनप्रसादी घेतली. त्यामुळे त्यांना रात्री छान झोप लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून स्नान, पूजा आटोपली आणि आश्रमाच्या सेवाधारींना नर्मदे हर करत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.


Labels: Narmada Parikrama, Bharuch, Bhrigu Kshetra, Tirthas, selfless service, companion illness, ancient temple neglect, spiritual journey, Apsareshwar, Kamnath Mandir

Search Description: A Marathi travelogue section detailing the Narmada Parikrama journey around December 31st. This part covers the spontaneous service provided by volunteers (Poha/Papaya prasad) at Eksaliya's Apsareshwar Mahadev Temple, visits to Tirthas in Bharbhut, the sudden illness and recovery of Navle Maharaj in Bharuch, and the spiritual halt at Kamnath Mandir and the historic Dashashwamedh Ghat..

Hashtags: #NarmadaParikrama #Bharuch #KamnathMandir #SevaBhav #TirthDarshan #Apsareshwar #NarmadeHar #CompanionCare #BhriguKshetra #EndOfYear

 


१९ नर्मदा परिक्रमा : टीबी गावातील मुक्काम १९ नर्मदा परिक्रमा : टीबी गावातील मुक्काम Reviewed by ANN news network on १०/०४/२०२५ १२:३९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".