शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेला २७ लाखांचा गंडा

 


एकाच बँक खात्यावर १०६ गुन्हे; आरोपी गजाआड

मुंबई, (प्रतिनिधी): कमी वेळेत शेअर ट्रेडिंगद्वारे भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ५८ वर्षीय महिलेची २७ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या सायबर आरोपींच्या टोळीतील एका सक्रिय हस्तकाला मुंबई सायबर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. आरोपीच्या बँक खात्याची तपासणी केली असता, या खात्यावर देशभरातून सायबर फसवणुकीच्या तब्बल १०६ तक्रारी दाखल असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

दहिसर, मुंबई येथे राहणाऱ्या फिर्यादी महिलेला जून २०२५ मध्ये एका अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून शेअर ट्रेडिंगची जाहिरात आली. ‘शिवानी’ नावाच्या या अनोळखी व्हॉट्सॲप धारकाने महिलेला भरघोस फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले. त्यानंतर m.tbstocktrade.com नावाचे बनावट ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडून, आयपीओ आणि ब्लॉक डील्स खरेदीसाठी वेगवेगळी बँक खाती देऊन लाखो रुपये भरण्यास सांगितले. आरोपींनी ॲपवर बनावटपणे मोठ्या नफ्याची रक्कम दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून एकूण २७ लाख ४४ हजार २३६ रुपयांची फसवणूक केली.

या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक कौशल्य आणि मानवी तपास पद्धतीचा वापर केला. तपासामध्ये असे निष्पन्न झाले की, आरोपींनी फसवणुकीची रक्कम त्वरीत इतर बँक खात्यात वळती केली होती. पोलिसांनी या बँक खात्यांचा शोध घेतला असता, हे खाते ठाणे येथील विनायक प्रमोदकुमार बरनवाल (वय २८, रा. कशेळी, ठाणे) याच्या नावावर असल्याचे आढळले. आरोपीने स्वतःच्या नावाने असलेले बँक खाते जाणूनबुजून गुन्ह्यासाठी वापरले होते. पोलिसांनी त्याला ठाण्यातून अटक करून त्याच्याकडून एक मोबाईल फोन जप्त केला आहे.

आरोपीच्या बँक खात्याची तपासणी केली असता, संपूर्ण भारतातून या खात्याविरोधात सायबर फसवणुकीच्या १०६ तक्रारी दाखल असल्याचे समोर आले आहे. 

ही कामगिरी  आयुक्त देवेन भारती,  सह आयुक्त  लखमी गौतम, अपर  आयुक्त शैलेश बलकवडे, उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर ट्रेडिंगद्वारे कमी वेळेत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवल्यास, अशा आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच, आपले बँक खाते दुसऱ्याला वापरण्यास देऊ नये. सायबर गुन्हे घडल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

  • Cyber Crime

  • Share Trading Fraud

  • Mumbai Police

  • Thane Arrest

 #MumbaiPolice #CyberCrime #ShareTradingFraud #ThaneArrest #FraudAlert #CyberSecurity #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा