भाजपच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानांतर्गत हजारो राख्या स्वीकारल्या
विरोधी पक्ष कितीही टीका करोत, महिलांसाठीच्या योजना बंद होणार नाहीत: मुख्यमंत्री
भगिनींच्या आशीर्वादाने २०२९ मध्येही आमचेच सरकार येईल - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, (प्रतिनिधी): देशातील एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत्या काळात एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. तसेच, विरोधक कितीही टीका करोत, पण महिलांसाठी सुरू केलेली एकही योजना पुढची पाच वर्षे बंद होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ या अभियानाचा भाग म्हणून जिल्हाभरातील भगिनींनी पाठवलेल्या हजारो राख्या स्वीकारण्याच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी, प्रेमपूर्वक पाठवलेल्या राख्या सन्मानपूर्वक स्वीकारल्या. ते म्हणाले, “इतक्या भगिनींचे प्रेम ज्याच्यापाशी आहे अशा माझ्यासारख्या भावाला कुणाचीही भीती नाही.” तसेच, महिलांच्या मताला 'व्होट चोरी' म्हणणाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. ‘व्होट चोरी’ म्हणणाऱ्यांचे डोके चोरी झाले आहे, अशा निर्बुद्धांसाठी २५ टक्के आशीर्वाद मागा, असे आवाहनही त्यांनी केले. परदेशात जाऊन भारताची बदनामी करणारे आता महाराष्ट्राची बदनामी बिहारमध्ये करत आहेत, पण त्यांची गत महाराष्ट्रासारखीच बिहारमध्येही होणार असल्याचे ते म्हणाले.
रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रासाठी १८ तास काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अनोखी भेट देण्याच्या विचारातून हा सोहळा आयोजित केला होता. राज्यभरातून तब्बल ३६ लाख ७८ हजार राख्या आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सहकारी संस्थांना डेडीकेटेड काम मिळायलाच हवे, यासाठी त्यांना हिस्सेदारी व हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच, भगिनींच्या आशीर्वादाने २०२९ सालीही आमचेच सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Devendra Fadnavis
Lakhpati Didi
BJP
Maharashtra Politics
Women Empowerment
#DevendraFadnavis #LakhpatiDidi #BJP #MaharashtraPolitics #WomenEmpowerment

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: