एकही बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या; कराडमध्ये अधिकाऱ्यांची बैठक
पूरग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागा शोधण्याचे निर्देश
पूर परिस्थिती नियंत्रणात येताच साथीचे रोग पसरणार नाहीत याची काळजी घ्या
सातारा, (प्रतिनिधी): पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेती, घरे, रस्ते, पूल आणि इतर मालमत्तांचे तात्काळ व वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. त्यांनी तांबवे पूल आणि कराड येथील प्रीतिसंगम येथील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृह कराड येथे आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
श्री. देसाई म्हणाले की, धरणातील विसर्ग कमी झाला असला तरी ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटलांनी २४x७ तास क्षेत्रीय स्तरावर उपलब्ध राहावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी धारकांचे दूरध्वनी क्रमांक संबंधित गावच्या सरपंचांना द्यावेत, जेणेकरून वाहतूक कोंडी झाल्यास रस्ते तातडीने पूर्ववत करता येतील.
ते म्हणाले की, कोयना धरणातून विसर्ग वाढल्यानंतर कराड शहरातील काही भागांमध्ये पूर येतो, त्यामुळे त्या कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी नगरपालिकेने जागा शोधावी. तसेच, नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी. पूर परिस्थिती ओसरल्यानंतर साथीचे रोग पसरणार नाहीत याचीही काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Shambhuraj Desai
Flood Relief
Damage Survey
Satara District
Maharashtra
#ShambhurajDesai #FloodRelief #Satara #Maharashtra #DamageSurvey
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: