दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी मुंबईत घरमालकांना भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक; नवा आदेश जारी
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
मुंबई, (प्रतिनिधी): संभाव्य विध्वंसक आणि समाजविरोधी कारवाया रोखण्यासाठी बृहन्मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. यानुसार, मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीला घर, मालमत्ता, हॉटेल, लॉज किंवा गेस्ट हाऊसमध्ये भाड्याने जागा देणाऱ्या प्रत्येक घरमालक, जागामालक किंवा व्यावसायिकांना आता भाडेकरूंचे सर्व तपशील पोलिसांना देणे बंधनकारक आहे. हा आदेश ३१ जुलै २०२५ पासून पुढील ६० दिवसांसाठी लागू असेल.
बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश काढला आहे. या आदेशानुसार, घरमालकांना त्यांच्या भाडेकरूंची सर्व माहिती मुंबई पोलिसांच्या अधिकृत नागरिक पोर्टलवर (www.mumbaipolice.gov.in/TenantForm?ps_id=0) ऑनलाईन सादर करावी लागेल.
हा आदेश जारी करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, दहशतवादी किंवा समाजविरोधी घटक भाडेकरूंच्या वेशात शहरात लपून विध्वंसक कृत्ये, दंगली किंवा अन्य हिंसक घटना घडवू शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता आणि मानवी जीवनाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जर भाडेकरू परदेशी नागरिक असेल, तर घरमालक आणि परदेशी नागरिक यांनी त्याचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट तपशील (क्रमांक, जारी केल्याचे ठिकाण आणि तारीख, वैधता), व्हिसा तपशील (क्रमांक, श्रेणी, जारी केल्याचे ठिकाण आणि तारीख, वैधता), नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण अशा सर्व गोष्टींची माहिती देणे अनिवार्य आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ नुसार कठोर कारवाई केली जाईल.
हा आदेश दि. ३१ जुलै २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंत (दोन्ही दिवसांसह) लागू राहील.
Mumbai Police
Tenant Verification
Police Order
Safety and Security
#MumbaiPolice #TenantVerification #SafetyAndSecurity #MumbaiNews #PoliceOrder #CrimePrevention #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: