मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट'चे उद्घाटन
‘साई’ ही देशातील एक पथदर्शक संस्था ठरेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कृषी, कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न
कला, वाणिज्य, विज्ञान विद्यार्थ्यांसाठी एआय शिक्षणाची सोय; पहिल्याच वर्षी १९० विद्यार्थ्यांचा प्रवेश
पुणे, (प्रतिनिधी): भारतीय जनतेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) लाटेत यशस्वी होण्याची क्षमता असून, हे ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आज गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात ‘सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’ (SAII) चे उद्घाटन करताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने कृषी क्षेत्रात एआयचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी गुगलसोबत करार केला असून, मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने मुंबई, पुणे आणि नागपूर येथे एआय संबंधित संस्था सुरू केल्या आहेत.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले की, कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी पदवीस्तरावर एआय शिक्षण देणारी ही राज्यातील पहिलीच संस्था आहे. या संस्थेत बी.बी.ए. इन एआय आणि बी.एस.सी. इन एआय हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
यावेळी सिम्बायोसिसच्या प्रधान संचालक डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या की, संस्थेच्या पहिल्याच वर्षी १९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. लवकरच नागपूर येथेही अशी संस्था सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘साई’ या बहुभाषिक व्हर्च्युअल असिस्टंटचेही लोकार्पण करण्यात आले.
Symbiosis AI Institute
Devendra Fadnavis
Pune
Artificial Intelligence
Inauguration
#Symbiosis #ArtificialIntelligence #DevendraFadnavis #Pune #Maharashtra #AI

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: