पुणे: दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली १ च्या बाहेरील आवारात खाजगी रायटर म्हणून काम करणाऱ्या अनिता विनोद रणपिसे (वय ५४, रा. जेजुरी जकात नाका, नारायणपूर रोड, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) या महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. एका ४५ वर्षीय तक्रारदाराकडून त्यांच्या १९८७ मधील घराच्या खरेदीखताची प्रत काढून देण्यासाठी कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी ५,००० रुपये आणि स्वतःसाठी १,००० रुपये अशी एकूण ६,००० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. रणपिसे यांनी ६,००० रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर त्यातील १,००० रुपये तक्रारदारास परत दिले होते.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराला त्यांच्या घरासाठी कर्ज काढायचे होते आणि त्यासाठी त्यांना १९८७ सालच्या घराच्या खरेदीखताची प्रत आवश्यक होती. त्यांनी ही प्रत मिळवण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली १, खडकमाळ, पुणे येथे अर्ज केला होता. कार्यालयाच्या बाहेर खाजगी रायटर म्हणून काम करणाऱ्या अनिता रणपिसे यांनी या कामासाठी ६,००० रुपयांची मागणी केली.
तक्रारदाराने २६ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे यासंदर्भात तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने २७ जून व ३० जून २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत अनिता रणपिसे यांनी खरेदीखताची प्रत काढून देण्यासाठी कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी ५,००० रुपये आणि स्वतःसाठी १,००० रुपये अशी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी सुरुवातीला ३,००० रुपये आगाऊ देण्याची मागणी केली होती.
१ जुलै २०२५ रोजी, तहसील कार्यालय, हवेली समोर असलेल्या मोकळ्या जागेत सापळा रचण्यात आला. या सापळ्यात अनिता रणपिसे यांनी तक्रारदाराकडून ६,००० रुपये लाच स्वीकारल्यानंतर त्यांना तात्काळ रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वीपणे पार पाडली. पोलीस उप अधीक्षक श्रीमती. भारती मोरे प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने काम करणाऱ्या खाजगी व्यक्तींकडून (एजंट) कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी झाल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी याबाबत माहिती दिली.
संपर्क क्रमांक:
अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे: ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
व्हॉट्सॲप क्रमांक (मुंबई): ९९३०९९७७००
ई-मेल: dyspacbpune@mahapolice.gov.in
वेबसाईट: www.acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन ॲप तक्रार: www.acbmaharashtra.net.in
Anti-Corruption, Pune, Bribery, Sub-Registrar Office, ACB Trap
#Pune #AntiCorruption #ACB #Bribery #MaharashtraPolice #RTI #SubRegistrarOffice #Haveli #CorruptionFreeIndia

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: