मंगळवार, २९ जुलै, २०२५

पुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार 'अंकनाद गणित सात्मीकरण प्रणाली'

 


गणिताची गोडी वाढवण्यासाठी इंडिविश वेलफेअर फाउंडेशनचा पुढाकार; प्रथितयश विद्यालयातील विद्यार्थी होणार संलग्न

पुणे: शालेय वयात असणारी गणिताची भीती कमी करून, अवघड वाटणाऱ्या या विषयाशी मैत्री करण्यात मदत करणारी “अंकनाद – गणिताची सात्मीकरण प्रणाली” ही इंडिविश वेलफेअर फाउंडेशन, मुंबईच्या माध्यमातून पुण्यातील प्रथितयश शिक्षण संस्थेतील १२ हजार ७५० विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार आहे. 'मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि., पुणे' निर्मित 'अंकनाद – गणिताची सात्मीकरण प्रणाली'चे वितरण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी, म्हणजेच १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे.

यासंबंधीचा प्रातिनिधिक कार्यक्रम भावे हायस्कूल (सदाशिव पेठ) येथे होणार आहे. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबा शिंदे, मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी, निर्मिती नामजोशी, पराग गाडगीळ तसेच इंडिविश वेलफेअर फाउंडेशनचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. इंडिविश वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

प्रणालीची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे

इंडिविश वेलफेअर फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था गणिताच्या मूलभूत गोष्टी रुजवण्यात प्रयत्नशील आहे. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मिळून एकूण ८७ विद्यालयांतील २५५ वर्गांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांमध्ये एक याप्रमाणे, या प्रणालीचे एक उपकरण (MP3 डिव्हाइस) देण्यात येणार आहे.

अनेक सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे की, ९०% विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती असते. ही भीती कमी करण्यात आणि गणिताशी मैत्री करण्यात “अंकनाद – गणिताची सात्मीकरण प्रणाली” उपयुक्त ठरणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगीतबद्ध पूर्णांक, अपूर्णांक आणि वर्गांचे पाढे आत्मसात करणे सोपे होईल, ज्यामुळे त्यांची गणिताशी मैत्री होईल. गणित हे सर्व विषयांची जननी असल्याने विद्यार्थ्यांची गणिताशी मैत्री होणे गरजेचे आहे, असे फाउंडेशनने म्हटले आहे.

तीन टप्प्यांमध्ये प्रणालीचा विस्तार

“अंकनाद – गणिताची सात्मीकरण प्रणाली” तीन टप्प्यांत विभागली आहे:

  • पहिला टप्पा: श्रवणसंस्कारातून पूर्णांक, अपूर्णांक आणि वर्गांचे पाढे आत्मसात करणे.

  • द्वितीय टप्पा: मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने पाढे सात्मीकरण स्पर्धा आयोजित करणे.

  • तिसरा टप्पा: 'गणितालय' पोर्टलचे सभासद होणे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांकरिता गणितीय संकल्पनांवरील १२०० हून अधिक व्हिडिओ, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे १००० हून अधिक मार्गदर्शक उपलब्ध आहेत. तसेच, गणित विषयाचा इतर विषयांशी संबंध अधोरेखित करणारे असंख्य वेबिनार उपलब्ध आहेत.

या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारशक्तीस चालना मिळेल आणि त्यांचा उजवा मेंदू कार्यान्वित होण्यास मदत होईल. ह्या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, यात शंकाच नाही, असे मंदार नामजोशी यांनी या पत्रकात म्हटले आहे.


 Anknad Ganit Satmikaran Pranali, Pune Education, Mathematics Learning, Indivish Welfare Foundation, Student Development, Bhave High School, Educational Initiative

 #Anknad #MathLearning #PuneEducation #IndivishFoundation #StudentDevelopment #Mathematics #EducationInitiative #Pune

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा