राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती; बावधनमध्ये उभारली जाणार 'म्युझियम सिटी'

 


उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचे निर्णय

मुंबई/पुणे (दि. १ जुलै): राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारित कामाला गती देण्यासाठी आज (सोमवारी) उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत बावधन बुद्रुक येथील ६ एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नव्याने उभारल्या जाणाऱ्या या 'म्युझियम सिटी'ला राजा दिनकर केळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार श्री. हेमंत रासने यांनी दिली.

बैठकीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चरची नेमणूक करण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, सविस्तर आराखडा तयार झाल्यानंतर त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल, असेही ठरले.

पुण्याच्या वैभवशाली इतिहासाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या केळकर संग्रहालयात ९ व्या शतकापासूनच्या २५,००० हून अधिक वस्तूंचा दुर्मीळ संग्रह आहे. सध्या जागेअभावी यातील केवळ १०% वस्तूच जनतेसाठी खुल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, संग्रहालयाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून यापूर्वीच बावधन बुद्रूक येथे ६ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांत पाटील, आमदार श्री. हेमंत रासने, सांस्कृतिक कार्य अपर मुख्य सचिव श्री. विकास खरगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्तीय सुधारणा सचिव श्रीमती शैला ए, वित्त व नियोजन सचिव श्री. राजेश देशमुख, संग्रहालयाचे संचालक श्री. सुधन्वा रानडे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री. सुरेंद्र रानडे, वास्तुरचनाकार श्री. राजेंद्र रानडे, प्रशासकीय अधिकारी भारती न्याती यांच्यासह, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, "नवीन संग्रहालयाचे बांधकाम दर्जेदार, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने व्हावे, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवकालीन, पेशवेकालीन आणि पुण्याच्या वैभवशाली वारशाच्या जतनासाठी माझा सतत प्रयत्न आहे. भविष्यात या 'म्युझियम सिटी'ची ओळख जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास आहे."

संग्रहालयाचे संचालक श्री. रानडे यांनी यावेळी संग्रहालय निर्मितीची पार्श्वभूमी आणि त्याची वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी स्पष्ट केले की, बावधन येथे प्रस्तावित असलेला 'म्युझियम सिटी' प्रकल्प हा केवळ एक संग्रहालय न राहता, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि पुणे शहराचा लौकिक जागतिक पातळीवर वाढवणारा एक पथदर्शी उपक्रम ठरेल.

Museum Expansion, Cultural Heritage, Pune, Maharashtra Government, Urban Development, Tourism, Ajit Pawar, Hemant Rasane

#RajaDinkarKelkarMuseum #MuseumCity #Bavdhan #Pune #CulturalHeritage #MaharashtraGovernment #AjitPawar #HemantRasane #TourismDevelopment

राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती; बावधनमध्ये उभारली जाणार 'म्युझियम सिटी' राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती; बावधनमध्ये उभारली जाणार 'म्युझियम सिटी' Reviewed by ANN news network on ७/०१/२०२५ ०४:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".