पुणे, ५ जुलै: पुणे शहर आणि परिसरातून चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. बिबवेवाडी, मार्केटयार्ड, कोथरूड आणि हडपसर पोलीस ठाण्यांमध्ये या मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी या मुलींचा शोध घेण्यासाठी सर्वसामान्यांना मदतीचे आवाहन केले आहे.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये १५ वर्षीय प्रियांका संजय मोहिते, १७ वर्षीय सोनाली खाजप्पा शिंदे, १७ वर्षीय गीता बाळराम पाटलावत आणि १५ वर्षीय आयशा योगेश साळुंखे यांचा समावेश आहे. या मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे.
बेपत्ता मुलींचा तपशील:
प्रियांका संजय मोहिते: बिबवेवाडी परिसरातून १२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ च्या सुमारास घरातून बेपत्ता झाली. तिचे वय १५ वर्षे असून, रंग सावळा, सडपातळ बांधा, अंदाजे ५.७ फूट उंची आहे. ती गुलाबी रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स घातलेली होती. तिच्याकडे चांदीच्या पाट्या, कानात रिंग आणि हातात तीन अंगठ्या होत्या. ती मराठी आणि हिंदी भाषा स्पष्ट बोलते.
सोनाली खाजप्पा शिंदे: मार्केटयार्ड येथील लेबर कॅम्प, सिद्धार्थ जैन बिल्डिंग, केळी बाजार परिसरातून बेपत्ता झाली. ती १७ वर्षांची असून, रंग गोरा, चेहरा गोल, लांब केस, सडपातळ बांधा, नाक बसके आणि नाकात चांदीची नथ आहे. तिने काळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची लेगिन्स घातली होती. तिला मराठी, कन्नड आणि हिंदी भाषा येते.
गीता बाळराम पाटलावत : कोथरूडमधील अचानक मित्र मंडळ, किष्कीदानगर येथून ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घरकामासाठी बाहेर पडली, पण परत आली नाही. तिचे वय १७ वर्षे १० महिने ०५ दिवस आहे. ती सडपातळ असून, उंची ४ फूट ८ इंच, रंग गोरा, चेहरा उभट, नाक सरळ आणि काळे लांब केस आहेत. तिने काळ्या रंगाचा टॉप (पांढऱ्या डिझाइनसह) आणि फिकट गुलाबी रंगाची लेगिन्स घातली होती. तिच्याकडे एअरटेल सिमकार्ड असलेला काळ्या रंगाचा विओ वाय-२० (VO Y-20) कंपनीचा मोबाईल होता. तिला मराठी आणि हिंदी भाषा येतात.
आयशा योगेश साळुंखे: हडपसरमधील दत्तमंदिर जवळ, कोदरे नगर, शेवाळवाडी येथून ९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री १० वाजता कुरकुरे आणण्यासाठी दुकानात गेली होती पण घरी परतली नाही. तिचे वय १५ वर्षे ९ महिने आहे. ती गोऱ्या रंगाची, पाच फूट उंचीची असून, काळे केस आणि गोल चेहरा आहे. तिने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस (लाल डिझाइनसह) आणि लाल-हिरव्या रंगाची चप्पल घातली होती. ती मराठी आणि हिंदी भाषा बोलते.
पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण (मो. ९१५८५६३१३२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मुलींचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
Missing Persons, Kidnapping, Pune Police, Public Appeal, Child Safety
#PunePolice #MissingGirls #Kidnapping #HelpFindThem #PuneSafety #ChildProtection

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: