मुंबई: राज्यात अधिक व्याजदराचं आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत विशेष मोहीम राबवण्यात येत असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं. तसेच, बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी अर्थात विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
नागरिकांनी गुंतवणूक करताना संबंधित संस्थेकडे आवश्यक परवाने, नोंदणी आणि अधिकृत मंजुरी याची खातरजमा करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा योजनांमार्फत फसवणुकीचे प्रकार घडू नयेत यासाठी आर्थिक गुप्तचर विभाग कार्यरत असून, संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. टोरस कंपनीविरोधात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणी शासनानं कारवाई सुरू केली असून, गेल्या तीन महिन्यांपासून एमपीआयडी (MPID) कायद्यान्वये कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी दिली.
बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 'एसआयटी'ची स्थापना करून या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून, दोषींना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, मुंब्रा इथं अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि तिची निर्घृण हत्या ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. या गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळावा, यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं.
Maharashtra Government, Devendra Fadnavis, Financial Fraud, SIT, Sexual Exploitation, Legislative Assembly, Public Safety, Justice, Police Action, Crime Prevention
#Maharashtra #DevendraFadnavis #FinancialFraud #SIT #JusticeForMinors #LegislativeAssembly #PublicSafety #BeedCase #MumbraCase #PoliceAction #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: