घरफोडी करणारा अटकेत, दागिन्यांसह रोकड जप्त
पुणे, १० जुलै २०२५: कोंढवा पोलिसांनी एका घरफोडीचा यशस्वी तपास करत २ लाख ४६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. या प्रकरणी रोहेल अरशद शेख (वय ३६, रा. सर्वे नं. ५, अश्रफनगर, अलिझा हाईटस्, फ्लॅट नं. ५०२, पाचवा मजला, कोंढवा बुद्रुक, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने त्याच्या दाजीच्या घरातच ही चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.कोंढवा येथील साईबाबानगरमध्ये राहणारे फिर्यादी आपल्या कुटुंबासोबत कामासाठी बाहेर गेले असताना, अज्ञात आरोपीने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून २,४६,०००/- रु. किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३०५ नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास पथकातील सहाय्यक निरीक्षक राकेश जाधव आणि इतर अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना, अंमलदार अनिल बनकर आणि केशव हिरवे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर चोरी रोहेल अरशद शेख याने केली असून तो गल्ली नं. ५, अश्रफनगर, अलिझा हाईटस् येथे थांबलेला आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रोहेल अरशद शेख याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम त्याच्या राहत्या घरातून काढून दिली.
ही कामगिरी सहाय्यक निरीक्षक राकेश जाधव, अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, सुरज शुक्ला, विजय खेगरे, राहुल थोरात, अनिल बनकर, सुजित मदन, विकास मरगळे, केशव हिरवे यांनी केली.
Crime, Robbery, Pune Police
#PunePolice #Kondhwa #TheftArrest #CrimeNews #RobberySolved

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: