पंढरपूर, ५ जुलै २०२५: महाराष्ट्रातून लाखो वारकरी आणि भक्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. या पूजेवेळी मानाचा वारकरी होण्याचा बहुमान पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याला मिळाला. दामू उगले आणि कल्पना उगले हे यंदाचे मानाचे वारकरी ठरले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
उगले दांपत्याचा सन्मान गेल्या १२ वर्षांपासून विठ्ठलभक्तीत लीन असलेल्या उगले दांपत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दांपत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. यानंतर त्यांचा शासकीय सत्कारही करण्यात आला. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी मानाचा वारकरी नाशिक जिल्ह्यातूनच निवडला गेला आहे. विठ्ठलाचे दर्शन रांग बंद करतेवेळी रांगेमध्ये उभे असणाऱ्या प्रथम दांपत्याला मानाचा वारकरी म्हणून हा मान मिळतो.
मुख्यमंत्र्यांनी मागितले राज्यासाठी आशीर्वाद महापूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल-रुक्मिणी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, "पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो. पांडुरंग मनातला ओळखणारा आहे, राज्यावरील पुढची संकटे दूर व्हावीत, बळीराजा सुखी आणि समाधानी व्हावा अशी मी प्रार्थना करतो." मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सुख-समृद्धीसाठी विठ्ठलाकडे साकडे घातले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूर नगरी विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमून गेली होती.
Pandharpur Wari, Ashadhi Ekadashi, Vitthal Mahapuja, Chief Minister, Devendra Fadnavis, Manacha Warkari, Nashik, Spirituality
#PandharpurWari #AshadhiEkadashi #Vitthal #Pandharpur #DevendraFadnavis #Maharashtra #Spirituality #Warkari

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: