नंदुरबार, दि. ५ जुलै २०२५: बालविवाह, गर्भलिंगनिदान, हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज नंदुरबार येथे दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित भरोसा सेलच्या आढावा बैठकीत त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनोद वळवी आणि उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. युनूस पठाण यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
भरपाई न देणाऱ्यांवर तातडीने कारवाई
न्यायालयाने महिलांना भरपाई देण्याचे आदेश दिले असूनही ज्या प्रकरणांमध्ये नियमित भरपाई दिली जात नाही, ती प्रकरणे तातडीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश चाकणकर यांनी दिले. "जबाबदारी झटकून कायदेशीर पळवाटा काढणारा हा देखील आरोपीच आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी आयोगाची भूमिका आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
खाजगी सोनोग्राफी केंद्रांवरही नजर
ज्या खाजगी सोनोग्राफी सेंटर्समध्ये गर्भलिंग निदानाचे काम सुरू आहे, अशा केंद्रांवर तातडीने कारवाई सुरू करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
कार्यस्थळी महिला छळाविरोधी समित्यांचा अहवाल मागवला
शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाविरोधात स्थापन करण्यात आलेल्या समित्या (ICC - Internal
Complaints Committee) कार्यरत आहेत की नाही, याबाबतची खातरजमा करून त्याचा अहवाल कामगार उपायुक्तांकडून १५ दिवसांच्या आत जिल्हा प्रशासनाने आयोगासमोर सादर करावा, असे निर्देशही चाकणकर यांनी दिले.
महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यात बालविवाह, मातामृत्यू, हुंडाबळी तसेच महिलांच्या समस्यांबाबत आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस विभागामार्फत महिलांसाठी राबवण्यात येणारे सोशल मीडिया हाताळणी प्रशिक्षण, डायल ११२ बाबत माहिती, महिलांविषयक कायद्याची माहिती, तसेच भरोसा सेलमार्फत महिलांना देण्यात येणारे मार्गदर्शन याविषयी महिला आयोग अध्यक्षांना अवगत केले.
यावेळी रूपाली चाकणकर यांच्या हस्ते शहर पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन व सुसंवाद केंद्राचे उद्घाटन देखील करण्यात आले.
Rupali Chakankar, Maharashtra State Women's Commission, Nandurbar, Child Marriage, Female Foeticide, Dowry Death, Domestic Violence, Bharosa Cell, Women's Empowerment, Police, District Administration, Sexual Harassment at Workplace.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: