मुंबई, दि. २ जुलै २०२५: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एल' विभागातील कुर्ला (पश्चिम) येथील एल.बी.एस. रोड आणि साकीनाका परिसरात गेल्या एका वर्षात (१ जुलै २०२४ ते ३० जून २०२५) १०८ अनधिकृत हॉटेल्स आणि ८१ लॉजिंग-बोर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषद सदस्य राजहंस सिंह यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सर्वश्री प्रवीण दरेकर, भाई जगताप, आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला.
कारवाई आणि पुढील उपाययोजना:
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, अनधिकृत हॉटेल्स आणि लॉजिंग पुन्हा बांधकाम करू नयेत यासाठी त्यांच्या पाणी आणि ड्रेनेजच्या लाईन्स तोडण्यात आल्या आहेत. मात्र, यापैकी ७३ प्रकरणे न्यायालयात गेल्याने त्यांच्यावरील कारवाई थांबली आहे. या प्रकरणी दोषी आढळलेल्या दोन स्वच्छता निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, एक कनिष्ठ अभियंता आणि एक मुकादम यांना निलंबित करण्यात आले आहे. महानगरपालिकेचे जे अधिकारी या प्रकरणी दोषी असतील, त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्याबाबत महानगरपालिकेला कळवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
हॉटेल सिटी किनारमधील आगीची भरपाई:
हॉटेल सिटी किनारमध्ये लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येकी ५० लाख रुपये भरपाई दिली जाईल आणि ही रक्कम हॉटेल मालकाकडून वसूल केली जाईल, अशी माहितीही राज्यमंत्री मिसाळ यांनी दिली. या प्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामांबाबतच्या कारवाईचा सविस्तर अहवाल आठ दिवसांत मागवून सभागृहाला अवगत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
BMC, Illegal Construction, Mumbai, Kurla, Madhuri Misal, Legislative Council, Hotel, Lodging, Urban Development, Enforcement
#BMC #Mumbai #IllegalConstruction #Kurla #MadhuriMisal #LegislativeCouncil #UrbanDevelopment #HotelAction #MumbaiNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: