पुणे जिल्ह्यात वनपर्यटनात मोठी क्षमता; पर्यावरणपूरक सुविधा विकसित करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

 


पुणे, २९ जुलै २०२५: पुणे जिल्ह्यात वनक्षेत्रात अनेक अतुलनीय पर्यटनस्थळे असून, त्यांचा सर्वांगीण विकास केल्यास जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले. पुणे वनविभागांतर्गत राजगड व अन्य किल्ले, तसेच जुन्नर वनविभागांतर्गत विविध घाट, धबधबे, डोंगर आदी ठिकाणी पर्यटकांसाठी पर्यावरणपूरक सुविधा विकसित करण्याचा आराखडा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीतील चर्चा आणि उपस्थितांचे योगदान

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनपर्यटन विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) जयश्री पवार, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई आदी उपस्थित होते.

पर्यावरणपूरक विकासावर भर

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वनविभागाच्या कार्यक्षेत्रात विविध सुविधा निर्माण करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. या सुविधा विकसित करताना वनविभागाचे नियम आणि मानके पाळली जावीत. स्थानिक दगड, माती आणि लाकूड यांचा वापर करून पर्यावरणपूरक विकास करावा. सिमेंट काँक्रीट किंवा अन्य बाबींचा वापर टाळावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

ज्या ठिकाणी पर्यटक अधिक भेटी देतात, अशी ठिकाणे निश्चित करून तेथे दगडी बाकडे, शौचालये, आवश्यक त्या ठिकाणी दगडी पायऱ्या वापरून लहान रस्ते, लाकडी बॅरिकेटिंग, रेलिंग आदी सुविधा निर्माण कराव्यात. संबंधित ठिकाणांची महत्त्वाची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी सायनेजेस (माहितीफलक) तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

राजगड आणि जुन्नर वनविभागातील प्रस्तावित विकास

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात करावयाच्या कामांसाठी संबंधित विभागाची 'ना-हरकत' (NOC) घ्यावी. राजगड किल्ला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे येथे विविध सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

या विविध ठिकाणी निर्माण करावयाच्या सुविधांच्या अनुषंगाने एका सल्लागार संस्थेने सादरीकरण केले. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी जुन्नर वनविभागातील नानेघाट, दाऱ्याघाट, आंबोली, कांचन, काळू, धूरनळी धबधबे, दुर्गवाडी कोकणकडा, भिवेगाव खेडकुंड, कुंडेश्वर निसर्ग पर्यटन, शिंगेश्वर मंदिर टेकडी, भामचंद्र डोंगर, तुकाईमाता मंदिर, अरण्येश्वर मंदिर, शिरूर ऑक्सिजन पार्क या ठिकाणी करावयाच्या पर्यटक सुविधांच्या अनुषंगाने आराखडा सादर केला.

यावेळी इको टूरिझम क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनीही विविध सूचना केल्या. या सूचनांचा समावेश पर्यटन स्थळांचा विकास करताना केला जाईल, असे जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सांगितले.


Pune District, Forest Tourism, Ecotourism, Jitendra Dudi, Rajgad Fort, Junnar Forest Division, Sustainable Development, Tourist Facilities, Maharashtra Tourism, Environment Friendly

 #PuneTourism #ForestTourism #Ecotourism #JitendraDudi #RajgadFort #Junnar #SustainableDevelopment #MaharashtraTourism #EnvironmentFriendly #NatureTourism

पुणे जिल्ह्यात वनपर्यटनात मोठी क्षमता; पर्यावरणपूरक सुविधा विकसित करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश पुणे जिल्ह्यात वनपर्यटनात मोठी क्षमता; पर्यावरणपूरक सुविधा विकसित करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश Reviewed by ANN news network on ७/२९/२०२५ ०९:१९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".