बुकिंग करूनही गृहप्रकल्प रेंगाळला, १५० जणांची १८ कोटींची फसवणूक (VIDEO)

 


पुणे, दि. २५ जुलै २०२५: नऱ्हे येथील 'किशोरी प्रांगण' गृहप्रकल्पात १५० ग्राहकांनी २० टक्के बुकिंग रक्कम भरूनही गेली चार वर्षे प्रकल्पाचे बांधकाम सुरु न केल्याने तब्बल १८ कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संतप्त ग्राहकांनी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासमोर 'विष प्राशन' आंदोलनाचा इशारा दिला. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आज दुपारी १ वाजता ही पत्रकार परिषद पार पडली.

पत्रकार परिषदेतील उपस्थिती आणि आरोप

या पत्रकार परिषदेत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, ग्राहकांच्या कायदेशीर सल्लागार ॲड. नीता जोशी, तसेच ग्राहकांचे प्रतिनिधी गिरीश चौधरी, प्रशांत कोल्हे, सूर्यकांत कुंभार उपस्थित होते. कसबा पेठेतील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शेटे आणि विजय रायकर हे 'किशोरी प्रांगण एलएलपी' या भागीदारी संस्थेत भागीदार आहेत. जागामालक निलेश दांगट आणि शाम दांगट यांनी या जागेचा विकसन करारनामा (DAPA Agreement) दिनांक ०३/११/२०२१ रोजी केला आहे. 

फसवणुकीचे स्वरूप आणि पोलिसांची निष्क्रियता

२०२१ साली १५० ग्राहकांनी नऱ्हे येथील 'किशोरी प्रांगण' या गृहप्रकल्पात २० टक्के रक्कम भरून बुकिंग केले होते. रेरा (RERA) रजिस्ट्रेशन असतानाही हे पैसे बिल्डरने रेरा अकाऊंटला न घेता वैयक्तिक खात्यात घेतले. बुकिंगचे निबंधक कार्यालयात नोंदणी (रजिस्ट्रेशन) केले नाही आणि बांधकामही सुरु केले नाही. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकांनी २०२४ मध्ये सिंहगड रस्ता पोलीस स्थानकात तक्रार केली. ३० ग्राहकांनी एकत्र येऊन सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार नंतर पोलीस कमिशनर ऑफिसला वर्ग करण्यात आली असून, त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कैलास करे हे करत आहेत. सर्व सभासदांची स्टेटमेंट नोंदवून साधारण २ महिने झाले तरीही पोलीस बिल्डर्सच्या विरोधात व जागा मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाहीत, असा ग्राहकांचा आरोप आहे."कोणतातरी राजकीय दबाव पोलीस यंत्रणेवर आहे," असा गंभीर आरोप या ग्राहकांनी पत्रकार परिषदेत केला, तसेच पोलिसांच्या वर्तणुकीबाबतही शंका व्यक्त केली.

ग्राहकांची बिकट अवस्था आणि आत्महत्येचे प्रयत्न

या ग्राहकांचे कर्ज आणि हप्ते सुरु झाले आहेत, तसेच सध्या जिथे राहतात त्या जागेचे घरभाडे सुरु आहे. सिबिल (CIBIL) खराब होऊ नये म्हणून हप्ते थकवता येत नाहीत आणि पोलीस दाद देत नाहीत, अशी बिकट अवस्था या दीडशे ग्राहकांची झाली आहे. आत्तापर्यंत यातील दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, पोलिसांना हे सांगून सुद्धा त्यात काही प्रगती होत नाही.

"आम्ही पोलिसांना पैसे दिले आहेत. आमचे काही वाकडे होणार नाही," असे हे बिल्डर ग्राहकांना तोंडावर सांगत असल्याचा दावा ग्राहकांनी केला. २०% रक्कम गुंतविल्यास सदनिकेचा करारनामा करून देणार या आश्वासनाप्रमाणे साधारण १५० जणांनी फ्लॅट बुकिंग केले होते. बिल्डरकडे ती रक्कम साधारण १८ कोटींपेक्षा जास्त जमा झाली आहे. ही रक्कम जमा करूनही अनेक सभासदांचे फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करून दिले नाही. दरवेळी प्रकल्प उशिरा सुरू होणार आहे याची वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. सदर प्रकल्प हा रेरा रजिस्ट्रेशन झाला आहे. रेरा सर्टिफिकेटप्रमाणे सदर प्रकल्प हा डिसेंबर २०२५ रोजी पूर्ण झाला पाहिजे, पण आजतागायत त्या जागेवर खड्डाही मारलेला नाही, असे ग्राहकांनी सांगितले.

आंदोलनाचा इशारा

"पोलिसांनी, आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई न केल्यास पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर विष प्राशन आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला."


Pune, Narhe, Kishori Prangan, Housing Fraud, Real Estate Scam, Consumer Fraud, Hindu Mahasangh, Protest, Police Inaction, RERA, Financial Crime, Suicide Attempt, Builder Fraud

 #Pune #HousingScam #KishoriPrangan #Fraud #RERAFraud #ConsumerProtection #HinduMahasangh #Protest #PoliceInaction #RealEstate #PuneNews

बुकिंग करूनही गृहप्रकल्प रेंगाळला, १५० जणांची १८ कोटींची फसवणूक (VIDEO) बुकिंग करूनही गृहप्रकल्प रेंगाळला, १५० जणांची १८ कोटींची फसवणूक (VIDEO) Reviewed by ANN news network on ७/२५/२०२५ ०५:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".