पूर्वसूचना न देता, कायद्याचे उल्लंघन करून पथविक्रेत्यांवर कारवाईचा आरोप
पुणे (दि. ४ जुलै २०२५): पुणे महापालिका हद्दीतील सिंहगड रस्त्यावरील फन टाईम टॉकीज परिसरात पथविक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कथित अन्यायकारक अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर-जिल्हा शाखेच्या वतीने आज महापालिकेसमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले, ज्यात अनेक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि पीडित पथविक्रेते सहभागी झाले होते.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता आणि पथविक्रेता संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत विक्रेत्यांचा माल जप्त केला, तसेच जप्त केलेल्या मालाची यादीही दिली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नाशवंत माल तत्काळ परत देण्याचा नियम असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पथविक्रेत्यांना न्याय नाकारला गेला, असे पक्षाने म्हटले आहे. संतप्त झालेल्या पथविक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक जनशक्ती पार्टीने ढोल-ताशांच्या गजरात महापालिकेच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी अतिक्रमण निरीक्षक मेघा राऊत, सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला. पथविक्रेत्यांच्या हक्कांचे उल्लंघन थांबवावे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.
या आंदोलनात निवृत्त सहाय्यक पोलिस अधीक्षक मिलिंद गायकवाड, के.सी. पवार, राहुल उभे, कल्पना जावळे, विजय अठवाल, अंकल सोनवणे, ॲड. अमित दरेकर, नारायण भिसे, रणजित सोनावळे, अभिजीत पाटील, आलोक गिरणे, कुसुम दहिरे, श्रावण कांबळे, अब्दुल शेख, स्वाती देशमुख, राजू म्हसके, शोभा कुडाळकर, मयूर विटेकर, राम आल्हाट, बंडू वाघमारे इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हे आंदोलन शांततेत पार पडले असले तरी, जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तर पुढील टप्प्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.
Pune News, Protest, Street Vendors, Civic Action, Political News
#PuneProtest #LJP #StreetVendorsRights #PMCAction #SinhagadRoad #AntiEncroachment #PunePolitics #VendorsRights #JusticeForVendors #LokJanshaktiParty

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: