ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर 'नाफा जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित!

 

सॅन होजे (अमेरिका): 'नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन' (NAFA) तर्फे देण्यात येणाऱ्या 'नाफा जीवन गौरव पुरस्काराने' यंदा ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना गौरवण्यात आले आहे. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, मल्याळम यांसारख्या विविध भाषांतील चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार आणि परिपक्व अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अमोल पालेकर यांच्या कार्याचा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी प्रेक्षकांच्या उपस्थितीत सॅन होजे येथील 'द कॅलिफोर्निया थिएटर'मध्ये २५ जुलै रोजी संपन्न झालेल्या 'नाफा ग्लॅमरस फिल्म अवॉर्ड नाईट' या भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप यांच्यासह मराठी चित्रपटक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार आणि प्रेक्षक उपस्थित होते. हा पुरस्कार स्वीकारताना अमोल पालेकर यांनी म्हटले की, "भविष्यात 'नाफा'च्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न पूर्ण होतील."

हॉलिवूड स्वप्न आणि 'नाफा'ची भूमिका

या सोहळ्यात पुढे बोलताना अमोल पालेकर म्हणाले, "माझा हा सन्मान केला, गौरव केला याबद्दल नाफाचे, अभिजीत घोलप आणि तुम्हा सर्व रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार. काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंच्या कथेवर आधारित सिनेमा करण्याची तयारी मी सुरू केली होती. त्या सिनेमात निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी सिनेमा बनवण्याचं माझं स्वप्न होतं. आम्ही निकोलपर्यंत पोहोचलो, तिला ती पटकथा आवडली आणि तिने तात्काळ होकारही दिला. मात्र, हॉलिवूडमधील कोणत्याही एका स्टुडिओला सोबत घेण्याची अट घातली. या किचकट गोष्टीची कल्पना असल्याने तो विचार मी सोडून दिला. पण त्यावेळेला जर 'नाफा'सारखी संस्था, असे कार्यकर्ते आणि अभिजीतसारखी व्यक्ती असती, तर तो प्रकल्प पुढे नेता आला असता. पण आता, 'नाफा'च्या माध्यमातून अशी स्वप्नं पूर्ण होतील, अशी मला आशा आहे."

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना हा पुरस्कार प्रदान करताना नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप म्हणाले, "यंदाचा नाफा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत आहे. पालेकरांच्या हळुवार, खुसखुशीत रोमँटिक भूमिकांनी आणि त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने तमाम भारतीय प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे. 'जुबिली स्टार' अशीही त्यांची ओळख भारतीय चित्रपटसृष्टीत आहे. अशा महान कलावंताचा हा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी रसिकांच्या हृदयातून, आपलेपणाने केला जात आहे. पालेकरांनी हा सन्मान स्वीकारून 'नाफा'चाच सन्मान वाढवला आहे."

अमोल पालेकरांची अभिनयातील देदीप्यमान कारकीर्द

अमोल पालेकर हे प्रसिद्ध भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते म्हणून ओळखले जातात, तसेच त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी ललित कलांमध्ये शिक्षण घेतले आणि 'सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मधून पदवी मिळवली. सुरुवातीला चित्रकार म्हणून काम केले, पण नंतर अभिनयात पदार्पण केले. 'शांतता! कोर्ट चालू आहे!', 'गोलमाल', 'बातों बातों में', 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'चित्तचोर', 'घरौंदा', 'मेरी बीवी की शादी', 'नरम-गरम', 'श्रीमान श्रीमती', 'आक्रीत', 'बनगरवाडी', 'ध्यासपर्व', 'कैरी', 'अनाहत', 'धूसर', 'थोडासा रूमानी हो जाय', 'पहेली' यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी अभिनय केलेल्या सर्वच चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत.

'नाफा फिल्म अवॉर्ड नाईट'चा दिमाखदार सोहळा

'नाफा'च्या फिल्म अवॉर्ड नाईटची सुरुवात 'रेड कार्पेटवरील एन्ट्रीने' झाली. सर्वप्रथम स्वप्नील जोशी एका नव्या लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरला. त्याला पाहून प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून त्याचे स्वागत केले. त्यानंतर वैदेही परशुरामी, आदिनाथ कोठारे, अमोल पालेकर आणि संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी तिच्या मुलीसह, अश्विनी भावे, सचिन खेडेकर, गजेंद्र अहिरे, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे आणि मधुर भांडारकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची एंट्री झाली. या सोहळ्यातील मनोरंजनपर कार्यक्रमात मराठी लोकनृत्याचे सादरीकरण पाहायला मिळाले आणि त्यानंतर कलाकारांना सन्मानचिन्हे देण्यात आली. अवधूत गुप्ते यांना प्रेक्षकांनी 'बाई बाई मनमोराचा' आणि 'आयुष्य हे' या गाण्यांची फर्माइश केली.

Amol Palekar, NAFA Lifetime Achievement Award, North American Film Association, Marathi Cinema, Bollywood, San Jose, Film Awards, Cultural Event

 #AmolPalekar #NAFA #JeevanGauravAward #MarathiCinema #Bollywood #FilmAwards #SanJose #CulturalEvent #HollywoodDreams #IndianActors

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर 'नाफा जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित! ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर 'नाफा जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित! Reviewed by ANN news network on ७/२७/२०२५ ०२:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".