पुणे: नाट्य आणि रंगभूमीच्या पडद्यामागे अहोरात्र कष्ट करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी विजय पटवर्धन फाऊंडेशनचा चौथा वर्धापन दिन १८ जून २०२५ रोजी प्रशांत सभागृह (लोकमान्य नगर) येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वनी संयोजन, प्रकाश योजना सहाय्य, नेपथ्य सहाय्य, वस्तू संकेत, निर्माता, निर्मिती सहाय्य, वेशभूषा संबंधी काम करणाऱ्या ८ रंगकर्मींना सन्मानित करण्यात आले. तसेच, दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या रंगकर्मींच्या पाल्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ. वृषाली विजय पटवर्धन यांनी लिहिलेल्या नर्मदा परिक्रमेवरील 'अनुभूती' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नाट्यनिर्मात्या सौ. भाग्यश्री देसाई, उमा सरदेशमुख, सुवीर सबनीस, अभिजीत पणशीकर, रवींद्र भिसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी माधव थत्ते (प्रकाशयोजना ऑपरेटर), रवी पाटील (ध्वनी संयोजक), शिरीष कुलकर्णी (नेपथ्य कलाकार), विनायक कापरे (वस्तू संयोजक), पुष्कर केळकर (उत्पादन प्रमुख), प्रसाद घोटवडेकर (निर्मिती व्यवस्थापक), राकेश घोलप (वेशभूषा सहाय्यक) आणि संजय जाधव (रंगमंच कामगार) या पडद्यामागील कलाकारांचा सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन गौरव करण्यात आला. घोड्यावर चढून स्पॉटलाइट ॲडजस्ट करणारा, डिमरवर बसून योग्य वेळी ब्लॅक आऊट करणारा, कलाकारांचे संवाद नीट ऐकू येतील याची काळजी घेणारा ध्वनी संयोजक, नेपथ्य उभे करणारा, रंगमंचावरील साहित्य योग्य पद्धतीने हाताळणारा मदतनीस अशा विविध प्रकारांतील पडद्यामागील कलाकारांना या कार्यक्रमात गौरविण्यात आल्याने हा सोहळा संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अभिनेते विजय पटवर्धन यांनी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली, तर चिन्मय पाटसकर यांनी सूत्रसंचालन केले. अभिनेते विजय पटवर्धन, सौ. वृषाली पटवर्धन, सुरेंद्र गोखले, अथर्व सुदामे, पवन वाघुलकर, धनंजय आमोणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाट्यनिर्मात्या सौ. भाग्यश्री देसाई म्हणाल्या, "रंगकर्मींच्या यशस्वी पाल्यांचा सत्कार त्यांना जबाबदारीची जाणीव देईल आणि पाठीवर थाप देईल. या शाबासकीतून त्यांनी आवडत्या क्षेत्रात मोठे होण्याचा प्रयत्न करावा. पडद्यामागे राबणाऱ्या हातांचा सन्मान करण्याचा विजय पटवर्धन फाऊंडेशनचा उपक्रम अनोखा आहे. कृतज्ञतेची ही जाणीव समाजात रुजणे आवश्यक आहे, ज्यामुळे सांस्कृतिक विश्व फुलायला मदत होईल."
सौ. वृषाली पटवर्धन यांनी आपल्या 'अनुभूती' पुस्तकाविषयी माहिती दिली. "खडतर शारीरिक व्याधींनंतर केलेली नर्मदा परिक्रमा संस्मरणीय ठरली. तेथे रोज लिहिलेले अनुभव पुस्तक रुपात आले, याचा आनंद आहे. या पुस्तक विक्रीतून आलेला निधी परिक्रमेतील आश्रमांना दिला जाणार आहे," असे त्यांनी सांगितले.
----------------------------------------------------------------------------------------------------
Vijay Patwardhan Foundation, Theatre Artists, Backstage Workers, Felicitations, Book Launch, Anubhuti, Narmada Parikrama, Pune Event, Cultural Program, Performing Arts, Bhagyshree Desai, Vrushali Patwardhan.
#VijayPatwardhanFoundation #TheatreArtists #BackstageHeroes #PuneEvents #CulturalProgram #BookLaunch #NarmadaParikrama #PerformingArts #Gratitude #MarathiTheatre

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: