लोणावळ्यातून लंपास केलेला बोलेरो पिकअप वाघोलीत सापडला
पुणे, २० जून: वाघोली पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने एका सराईत वाहन चोराला ताब्यात घेऊन, लोणावळ्यातून सुमारे एक वर्षापूर्वी चोरी झालेला बोलेरो पिकअप टेम्पो जप्त केला आहे. सुनिल आण्णा कांबळे (वय ४०, रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.१९ जून २०२५ रोजी वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठनिरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी उपनिरीक्षक मनोज बागल, अंमलदार प्रदिप मोटे, पांडूरंग माने, विशाल गायकवाड, समीर भोरडे हे गुन्हे प्रतिबंधक अनुषंगाने पेट्रोलींग करत होते. वाघेश्वर मंदिर, वाघोली येथे असताना अंमलदार प्रदिप मोटे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक अर्धवट नंबरप्लेट असलेली संशयित पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी वाघोली बाजारतळ येथे उभी आहे.
या माहितीनुसार, पथकाने तात्काळ वाघोली बाजारतळ येथे जाऊन पाहणी केली असता, तेथे अर्धवट नंबरप्लेट असलेली पिकअप दिसून आली. वाहन चालकाच्या जागेवर सुनिल आण्णा कांबळे हा बसलेला आढळला. त्याला गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्याला पिकअप टेम्पोसह वाघोली पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता, त्याने एक वर्षापूर्वी औढोली, मावळ, लोणावळा भागातून एका घरासमोरून ही पिकअप गाडी चोरली असल्याचे कबूल केले.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथील अभिलेखाद्वारे पडताळणी केली असता, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १२/२०२४ भारतीय दंड विधान कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी आणि बोलेरो पिकअप गाडी पुढील तपासकामी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडे ताब्यात देण्यात आली आहे.
ही कामगिरी अपर आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, उप-आयुक्त परीमंडळ ४, पुणे शहर हिम्मत जाधव, सहाय्यक आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Crime, Vehicle Theft, Arrest, Pune Police, Wagholi, Lonavala
#WagholiPolice #VehicleTheft #PuneCrime #Lonavala #Arrest #BoleroTheft
Reviewed by ANN news network
on
६/२०/२०२५ ०१:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: