पुणे, दि. २: स्वारगेट बस डेपो परिसरात पीएमपीएमएल बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन एका ३९ वर्षीय महिलेच्या बॅगेतून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ६९ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना १ जून २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पीडित ३९ वर्षीय महिलेने (रा. आंबेगाव, पुणे) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्या स्वारगेट बस डेपोतून पीएमपीएमएल बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या नकळत त्यांच्या जवळील बॅगेची चेन उघडून आतील ऐवज काढून घेतला.
चोरट्याने बॅगेतील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ६९ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरला. बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने बॅग तपासली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस बस डेपो परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि बसमधील प्रवाशांकडे चौकशी करून आरोपीचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #SwargateBusDepot #Theft #Robbery #PMPML #PunePolice
Reviewed by ANN news network
on
६/०२/२०२५ ०४:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: