पिंपरी-चिंचवड, दि. ४ जून: शिरगाव पोलिसांनी पुसाणे गावच्या हद्दीत ओढ्याजवळ सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे ३० हजार रुपये किमतीचे ८००० लिटर गूळमिश्रित रसायन नष्ट केले आहे. कारवाईची चाहूल लागताच दारू तयार करणारी महिला पळून गेली.
काय आहे घटना?
ही कारवाई मंगळवारी (दि. ३) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसाणे गावातील किर्ती ग्रीन फार्मच्या बाजूला असलेल्या ओढ्याजवळ करण्यात आली. पोलिसांना या ठिकाणी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता, एक २२ वर्षीय महिला (रा. कंजारभाट वस्ती, पुसाणे, ता. मावळ) ही अनधिकृतपणे, स्वतःच्या फायद्यासाठी चार प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये सुमारे ८००० लिटर गूळमिश्रित रसायन हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भिजत घालताना आढळून आली. जप्त केलेल्या रसायनाची किंमत अंदाजे ३० हजार रुपये आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला ओढ्याच्या काठावरील झाडाझुडपांचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाली.
गुन्हा दाखल, तपास सुरू
याप्रकरणी पोलीस हवालदार तुकाराम चिंधू साबळे (नेमणूक - शिरगाव परंदवाडी पोलीस स्टेशन) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फरार महिलेविरुद्धगुन्हा दाखल केला असून, तिचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करत आहेत.
शिरगाव पोलिसांची कारवाई, हातभट्टी दारूसाठी तयार केलेले ३० हजारांचे रसायन नष्ट
Reviewed by ANN news network
on
६/०४/२०२५ ०४:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: