पिंपरी, दि. २: पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शाश्वत वाहतूक उपाययोजनांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) आणि ब्रिटिश उच्चायुक्त, मुंबई तसेच ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल) यांच्या संयुक्त विद्यमाने कमी उत्सर्जन क्षेत्रे (लो इमिशन झोन्स - एलईझेड) योजनेच्या नियोजन व अंमलबजावणीवर आधारित पाच दिवसीय तांत्रिक कार्यशाळेचा आज (२ जून २०२५) शुभारंभ झाला.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि ब्रिटिश उच्चायुक्त जेमी स्कॅटरगुड यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, कार्यकारी अभियंता सुनिल पवार, हरविंदसिंग बन्सल, सोहम निकम, यूके पॅक्ट प्रकल्प अधिकारी कनुप्रिया शर्मा, ट्रान्सपोर्ट फॉर लंडनच्या लीह रॅफर्टी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मेट्रोचे वरिष्ठ सहाय्यक महाव्यवस्थापक रत्नाकर पांडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी मंचक जाधव, पुणे महानगर परिवहन महामंडळचे बीआरटी व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, ग्लोबल ट्रॅफिक सोल्यूशनचे प्रताप भोसले यांच्यासह महापालिका अधिकारी, ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी, टीएफएलचे तज्ञ आणि वाहतूक क्षेत्रातील विविध विशेषज्ञ उपस्थित होते.
२ ते ६ जून २०२५ या कालावधीत आयोजित या कार्यशाळेत टीएफएलचे तज्ञ मार्गदर्शन करणार असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कमी उत्सर्जन क्षेत्र धोरणाच्या अंमलबजावणीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. कार्यशाळेत नियोजन, अंमलबजावणी, जनजागृती, तंत्रज्ञान आणि हितधारक संवाद यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर सखोल चर्चा होणार आहे. लंडनमधील अल्ट्रा लो इमिशन झोनच्या (यूएलईझेड) यशस्वी अनुभवावर आधारित हे प्रशिक्षण सत्र असणार आहे. ही कार्यशाळा महापालिकेच्या लो इमिशन मोबिलिटी झोन्स (एलईएमझेड) धोरणाला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल.
ट्रान्सपोर्ट फॉर लंडनसोबत केलेली ही भागीदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवांतून शिकण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. विशेषतः वायुप्रदूषण मोजणी, जनजागृती मोहिम, तांत्रिक अंमलबजावणी आणि नागरिकांचा सहभाग यासाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती वाढवणे, माहिती निरीक्षण प्रणाली सक्षम करणे आणि अंमलबजावणीसाठी संस्थात्मक क्षमता वाढवणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.
हा उपक्रम यूके-इंडिया पार्टनरिंग फॉर एक्सलरेटेड क्लायमेट ट्रान्झिशन निधीच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ हवा मोहिमेला पूर्णपणे अनुरूप आहे. महापालिकेच्या 'ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन'मध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या लो इमिशन मोबिलिटी झोन धोरणानुसार, २०२६ पर्यंत निवडक भागांमध्ये केवळ बीएस-६, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांनाच वापरण्याची परवानगी देण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.
पुढील चार दिवसांच्या कार्यशाळेत कमी उत्सर्जन क्षेत्र धोरणाची एकत्रित शहरी विकासाशी सांगड घालणे, नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्टचा समावेश करणे, इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्दिष्टांची पूर्तता आणि सार्वजनिक वाहतूक सुविधांशी प्रभावी संलग्नन यावर विस्तृत चर्चा होणार आहे.
"पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शाश्वत वाहतूक उपाययोजनांसाठी एक व्यापक प्रणाली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने तयार करण्यात येत आहे. यासाठी ट्रान्सपोर्ट फॉर लंडनचे तांत्रिक सहकार्य नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या संस्थेच्या तज्ज्ञांकडून करण्यात येणाऱ्या मार्गदर्शनामुळे शहरातील कमी प्रदूषण क्षेत्रे प्रभावीपणे निश्चित करून त्यादृष्टीने नियोजन करणे शक्य होईल, व हे नियोजन पिंपरी चिंचवड शहरामध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवता येईल."
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
"स्वच्छ आणि आरोग्यदायी शहरे निर्माण करण्यासाठी ब्रिटन सरकार आणि भारत सरकार दोघांची समान प्राथमिकता आहे. यूके पॅक्ट आणि ट्रान्सपोर्ट फॉर लंडन यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने ही कार्यशाळा आयोजित करून शहराच्या स्वच्छ वाहतूक आणि शाश्वत नागरी विकासाच्या उद्दिष्टाला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. ही आमच्यासाठी देखील अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण स्थानिक पातळीवरील भागीदारी कशा प्रकारे जागतिक हवामान कृतीस चालना देऊ शकते, याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे."
- जेमी स्कॅटरगुड, ब्रिटिश उच्चायुक्त, मुंबई
-------------------------------------------------------------------------------------------------
#PimpriChinchwad #LowEmissionZone #AirQuality #SustainableTransport #UKPACT #TransportForLondon #CleanAir #SmartCity
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा