पुणे, दि. ४ जून: कोथरूडमधील एका बांधकाम साईटवर पेंटिंगचे काम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एका ३० वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षेची योग्य साधने न पुरवल्यामुळे मजुराचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे घटना?
ही घटना २० एप्रिल २०२५ रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील पौड रोड येथील रामबाग कॉलनीतील उमा महेश को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी येथे घडली. मयत मजूर जगतमूरत गुलाब निषाद (वय ३०, रा. केळेवाडी, पौड रोड, कोथरूड) हा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पेंटिंगचे काम करत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
ठेकेदाराचा हलगर्जीपणा
कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद (अ.मृ. रजि.नं. ४८/२०२५) करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, संबंधित ठेकेदाराने कामावर असलेल्या मजुरांना हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट यांसारखी कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळेच जगतमूरत निषाद याचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला.
गुन्हा दाखल
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार आडगळे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. आर. आडगळे करत आहेत.
बांधकाम साईटवर सुरक्षेअभावी मजुराचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल
Reviewed by ANN news network
on
६/०४/२०२५ ०४:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: