वारीसोहळ्याची जबाबदारी समन्वयाने पार पाडा; अतिरिक्त आयुक्त

 


पिंपरी, १३ जून २०२५: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी सर्व कामे वेळेत पूर्ण करून सूक्ष्म नियोजनाने जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. त्यांनी दोन्ही पालखी मार्गांची पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा येत्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळांची, तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मार्ग, विसाव्याची ठिकाणे आणि महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षांची आज पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यावेळी  संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्तांच्या महत्त्वाच्या सूचना:

अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी आषाढीवारी पालखीने पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर निगडी येथील भक्ती-शक्ती येथे वारकरी बांधव, विश्वस्त आणि दिंडीप्रमुखांचे महापालिकेच्या वतीने स्वागत कसे केले जाईल, याबाबत माहिती घेतली. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असतो, त्या ठिकाणाचीही त्यांनी पाहणी करून आवश्यक व्यवस्थांबाबत सूचना दिल्या. तसेच, आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय आणि इतर खासगी ठिकाणी दिंड्यांचा मुक्काम असतो, त्या सर्व ठिकाणी महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

याशिवाय, खराळवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, नाशिक फाटा रोड, दापोडी येथील पालखी विसावा या ठिकाणांची पाहणी करताना त्यांनी पुढील सूचना केल्या:

  • पालखी मार्गावरील अडथळा ठरणारे अतिक्रमण तातडीने हटवावे.
  • महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारावे.
  • विद्युत वाहक तारा हटवाव्यात.
  • पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक आपत्ती व्यवस्थापन करावे.
  • उघड्या गटारांसंदर्भात कार्यवाही करावी.
  • पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी.
  • तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी आवश्यक ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी.
  • पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत.
  • पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी.
  • आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावावेत.
  • पालखी मार्गावर आवश्यक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकांची नेमणूक करावी.

स्थापत्य, विद्युत, रस्ते वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान, शिक्षण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आवश्यक ती तयारी पूर्ण करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


Ashadhi Wari Palkhi, Pimpri Chinchwad, Municipal Corporation, Pilgrimage Preparation, Sant Tukaram Maharaj Palkhi, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi

 #AshadhiWari #PalkhiSohala #PimpriChinchwad #PMC #PilgrimFacilities #WariPreparation #SantTukaram #SantDnyaneshwar

वारीसोहळ्याची जबाबदारी समन्वयाने पार पाडा; अतिरिक्त आयुक्त वारीसोहळ्याची जबाबदारी समन्वयाने पार पाडा; अतिरिक्त आयुक्त Reviewed by ANN news network on ६/१३/२०२५ १०:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".