'डिजिटल अरेस्ट' फसवणुकीतील आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

 


  • डीएचएल कुरिअरच्या नावाखाली 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी देऊन ३.०४ कोटींची फसवणूक.

  • फसवणुकीची रक्कम क्रिप्टो करन्सी (USDT - VDA) माध्यमातून परदेशात पाठवली जात होती.

ठाणे: ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये, ठाणे सायबर पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी देऊन सर्वसामान्य नागरिकांना लुबाडत होती आणि फसवणुकीची रक्कम क्रिप्टो करन्सी (VDA) माध्यमातून परदेशात पाठवत होती. दिनांक २४ जून २०२५ रोजी ही कारवाई उघडकीस आली, ज्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यातील एका प्रकरणात, ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ७७६/२०२४ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१६ (५), ३३६(३), ३४० (२) सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादींना त्यांच्या मोबाईलवर फोन करून 'डीएचएल' (DHL) कंपनीचे कुरिअर पार्सल सीज झाल्याचे सांगण्यात आले. या पार्सलमध्ये १ लॅपटॉप, १४० ग्रॅम ए.डी. पावडर (अंमली पदार्थ), थाई पासपोर्ट, ३ क्रेडिट कार्ड, ४ किलो कपडे असल्याचे सांगून, सदर पार्सलशी संबंध नसल्यास पोलिसांना कळवण्यास सांगण्यात आले.

यानंतर, दुसऱ्या मोबाईलवरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून स्वतःला 'सी.बी.आय.' (CBI) अधिकारी भासवण्यात आले. फिर्यादींना वेळोवेळी कॉल करून 'डिजिटल अरेस्ट' केल्याचे सांगण्यात आले आणि त्यांना बनावट कागदपत्रे पाठवण्यात आली. त्यांच्या बँक खात्यातील रक्कम (स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया) आरोपींच्या वेगवेगळ्या लाभधारक बँक खातेदार यांच्या खात्यांवर तपासणीसाठी वळती करण्यास भाग पाडण्यात आले. अशा प्रकारे, फिर्यादीच्या खात्यातून एकूण ३,०४,००,०००/- रुपये (३ कोटी ४ लाख रुपये) रक्कम स्वतःच्या खात्यांवर वळती करून ती परत न करता फसवणूक करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाणे, ठाणे शहर यांचेकडून करण्यात येत असताना, ही टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असून तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत कार्यप्रणालीचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. तपासाधीन गुन्ह्यातील फिर्यादीची फसवणूक झालेल्या रकमेपैकी ८२,४६,०००/- रुपये रक्कम आरोपींनी युएसडीटी (USDT - Virtual Digital Asset) द्वारे परदेशात पाठविल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी, दिनांक १९ जून २०२५ रोजी रात्री १९:५० वाजता तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे: १. किशोर बन्सीलाल जैन (वय ६३), व्यवसाय: श्री. सत्कार पतपेढीचे चेअरमन, रा. रुम नं. ३१, अहमद सेलर बिल्डींग नं. ३, महात्मा जोतीबा फुले रोड, हिंदमाता सिनेमा जवळ, दादर, मुंबई ४०००१४. २. महेश पवन कोठारी (वय ३६), व्यवसाय: गारमेंट व इमीटेशन ज्वेलरी, रा. ५०२, औरम अपार्टमेंट, वाकोला मशीदसमोर, सांताक्रूझ पूर्व, मुंबई नं. ५५. ३. धवल संतोष भालेराव (वय २६), व्यवसाय: कॉस्मेटिकचा व्यवसाय, रा. एच.डी.आय.एल. धीरज ड्रीम, १डी/२०२, भांडूप रेल्वे स्टेशन जवळ, भांडूप (प), मुंबई नं. ७८.

अटक आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक तपास करण्यात येत आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश वारके, सायबर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

ही कामगिरी उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा/सायबर पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा/सायबर दत्तात्रय पाबळे, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश वारके, निरीक्षक सुदेश आजगावकर, प्रियांका शेळके, सहायक निरीक्षक मंगलसिंग चव्हाण, प्रदिप सरफरे, चेतन पाटील, ग्रेड उपनिरीक्षक अविनाश बाबरेकर, हवालदार वर्षा माने, शिपाई दिपक खोत, जालिंदरनाथ डावरे, विजय पाटील, प्रविण आव्हाड, राजेंद्र नेगी, प्रविण इंगळे यांनी  केली.

Digital Arrest Scam, Cyber Fraud, Cryptocurrency, International Crime, Thane Police, Financial Crime, Impersonation. 

 #ThaneCyberPolice #DigitalArrestScam #CryptocurrencyFraud #FinancialCrime #MumbaiPolice #Cybersecurity

'डिजिटल अरेस्ट' फसवणुकीतील आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश 'डिजिटल अरेस्ट' फसवणुकीतील आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश Reviewed by ANN news network on ६/२५/२०२५ ०९:१२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".