रविवार, १ जून, २०२५

ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांना खंडणीसाठी धमकावणारा गुन्हेगार अटकेत

 


ठाणे: कोपरी परिसरात कोयता घेऊन ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी वसूल करणाऱ्या, जबरी चोरी, गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने नाशिक येथे अटक केली आहे.

कोपरी, ठाणे पूर्व परिसरात राहणारे वयोवृद्ध नागरिक फिर्यादी असून ते पत्नी आणि मुलासह दुचाकी व चारचाकी गाड्यांचे सर्विस सेंटर चालवतात. २३ मे, २०२५ रोजी फिर्यादी त्यांच्या कामासाठी रस्त्यावरून जात असताना, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सनी उमेश तेलुरे याने त्यांना रस्त्यात अडवले. तेलुरेने कोयत्याचा धाक दाखवून सर्विस सेंटर चालवायचे असल्यास महिन्याला ३०००/- रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली.

फिर्यादीने हप्ता देण्यास नकार दिल्यावर, तेलुरेने त्यांना शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि मारहाण केली. आरोपीने त्यांच्या खिशातून २९००/- रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि कोयत्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या व सामानाची तोडफोड करून व्यापारी व लोकांमध्ये दहशत निर्माण केली.

या घटनेनंतर फिर्यादीने कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(६), ३२४(४), ३२४(५), ३५१(२), ३५१(३) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सनी तेलुरे फरार झाला होता आणि पोलिसांना सापडत नव्हता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस आणि त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तेलुरेच्या मोबाईल फोन क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवून, पोलिसांनी आरोपी सनी उमेश तेलुरे (वय २३ वर्षे, रा. बिल्डिंग नं. २ चे पाठीमागे, पी. डब्लू. डी. चाळ, सिद्धार्थ नगर, कोपरी कॉलनी, फटाका मार्केट, ठाणे पूर्व) याला २८ मे, २०२५ रोजी नाशिक येथून अटक केली

आरोपी सनी तेलुरे याच्यावर या गुन्ह्याव्यतिरिक्त कोपरी पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा (गु. र. नं. ३४०/२०२५, भा. न्या. सं. ३०८(४), १२६(२), ३५२, ३५१(३), ३(५)) दाखल आहे. खंडणी विरोधी पथकाने या कारवाईत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ०२ जून, २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर हे करत आहेत.

अटक करण्यात आलेला आरोपी सनी उमेश तेलुरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत, ज्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

ही कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १, तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, सुनिल तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, सहाय्यक उपनिरीक्षक संदीप भोसले, पोलीस हवालदार दिपक गडगे, संजय राठोड, राजाराम पाटील, योगीराज कानडे, अभिजीत गायकवाड, शैलेश शिंदे, शितल पावसकर, नाईक रविंद्र हासे, शिपाई अरविंद शेजवळ, तानाजी पाटील, विनोद ढाकणे, संतोष वायकर, मयुरी भोसले, चालक  भगवान हिवरे यांनी केली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा