सायबर गुन्हेगारांनी रिमोट ऍक्सेसद्वारे लुटले ६ लाख
पुणे: शहरातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सायबर गुन्हेगारांकडून तब्बल ६ लाख १८ हजार २९८ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बँकेचे केवायसी (KYC) अपडेट करण्याच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली असून, या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी २०२५ रोजी घडलेल्या या घटनेत फिर्यादीला एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून केवायसी अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते.
या उद्देशाने आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलवर एक संदिग्ध लिंक पाठवून एपीके (APK) फाईल डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीने अनावधानाने ती फाईल डाऊनलोड केली, ज्यामुळे आरोपीला त्यांच्या मोबाईल फोनचा रिमोट ऍक्सेस मिळाला. या तंत्राचा दुरुपयोग करून गुन्हेगाराने फिर्यादीच्या बँक खात्यातून एकूण ६ लाख १८ हजार २९८ रुपये काढून घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, अज्ञात मोबाईल धारक आणि लिंक पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा