पुणे, २७ जून २०२५: पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (२७ जून) मोठी कारवाई करत, नवीन सोसायटीच्या नोंदणीसाठी लाच मागणाऱ्या दोन लोकसेवकांना रंगेहाथ पकडले.
नेमके काय घडले?
या कारवाईत संगीता सुभद्रा बाबराव किरवले चौधरी (वय ५०, सहकारी अधिकारी, दापोडी उपनिबंधक कार्यालय) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यासह उपनिबंधक मुकुंद विमल भास्कर पवार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ३३ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या नवीन सोसायटीच्या नोंदणीसाठी २५ मार्च २०२५ रोजी दापोडी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी सहकारी अधिकारी किरवले-चौधरी यांनी सोसायटीच्या एका सभासदासाठी ७०० रुपये याप्रमाणे एकूण १६ सभासदांसाठी ११ हजार २०० रुपयांची लाच मागितली होती. यापैकी ७ हजार ५०० रुपये तक्रारदाराकडून अगोदरच घेण्यात आले होते आणि सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले होते.
उर्वरित लाचेसाठी बायलॉज अडवले
मात्र, लाचेची संपूर्ण रक्कम न मिळाल्याने किरवले-चौधरी यांनी तक्रारदाराला सोसायटीचे बायलॉज (उपविधी) बुकलेट दिले नव्हते. जेव्हा तक्रारदार हे बायलॉज घेण्यासाठी किरवले-चौधरी यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी उर्वरित ३ हजार ७०० रुपयांची लाच मागितली. या प्रकारानंतर तक्रारदाराने २६ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली.
सापळा रचून एसीबीची कारवाई
प्राप्त तक्रारीच्या आधारे एसीबीने २६ जून रोजी पडताळणी केली. या पडताळणीत संगीता किरवले-चौधरी यांनी ११ हजार २०० रुपये लाच मागितल्याचे आणि त्यातील ७ हजार ५०० रुपये घेऊन उर्वरित ३ हजार ७०० रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. यावेळी उपनिबंधक मुकुंद विमल भास्कर पवार यांनीही किरवले-चौधरी यांना लाच मागणीसाठी प्रोत्साहन दिल्याचे समोर आले.
शुक्रवारी (२७ जून) एसीबीने दापोडी येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात सापळा रचला. या सापळा कारवाईत संगीता सुभद्रा बाबराव किरवले चौधरी यांनी तक्रारदाराकडून ३ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेने शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ACB Trap, Dapodi Sub-Registrar Office, Bribery Case, Cooperative Societies, Anti-Corruption Bureau, Pune, Public Servants Arrested, Corruption, New Society Registration
#ACBRaid #Dapodi #Pune #Corruption #Bribery #CooperativeSocieties #PublicServants #AntiCorruption #MaharashtraPolice #Arrested

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: