बुधवार, २८ मे, २०२५

उरणमध्ये अतिवृष्टी; शेतकरी कामगार पक्षाची नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीची मागणी

 


उरण: उरण तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळवाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाने प्रशासनाकडे नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी केली आहे.

उरण तालुक्यात जोरदार पाऊस आणि वादळवाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. पूर्व विभागातील ७० हून अधिक घरांची नासधूस झाली असून पत्रे, शेड उडाले आहेत आणि घरांच्या भिंती पडल्या आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने टीव्ही, फ्रिज, पंखे यांसारखी उपकरणे खराब झाली आहेत, तसेच साठवलेले अन्नधान्यही भिजून वाया गेले आहे. यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जीविताला धोका निर्माण झाला आहे.

शेतकरी कामगार पक्षाने तहसीलदारांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त गावांमध्ये तातडीने पंचनामे करण्याची आणि शासकीय मदत पुरवण्याची मागणी केली आहे. नायब तहसीलदार महेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेश घरत, तालुका चिटणीस रवी घरत, विधानसभा अध्यक्ष रमाकांत पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा