शहरातील वाहतूक, बांधकाम आणि कचरा व्यवस्थापनातून होणारे प्रदूषण कमी करण्यावर चर्चा
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे आज, १५ मे २०२५ रोजी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत 'टुवर्ड्स क्लीन एअर इन पुणे' या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे पार पडली.
या कार्यशाळेत पुणे महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे अधिकारी श्री मंगेश दिघे यांनी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाविषयी माहिती दिली. दिल्ली येथील वायू प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अमर देसाई यांनी हवा प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. हवेची गुणवत्ता आणि मानवी आरोग्यावर त्याचे होणारे गंभीर परिणाम यावर विविध तज्ज्ञांनी यावेळी आपले विचार मांडले.
परिसर संस्थेचे श्री रणजित गाडगीळ यांनी हवेची गुणवत्ता आणि पुणे महानगरपालिकेमार्फत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शहरामध्ये वाहतूक, बांधकाम आणि घनकचरा व्यवस्थापनातून होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजनांवर या कार्यशाळेत सखोल चर्चा झाली.
या कार्यशाळेत पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ एक व दोन अंतर्गत असणाऱ्या सहायक आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वॉर्ड मेडिकल ऑफिसर तसेच विद्युत विभाग, उद्यान विभाग, पथ विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस इत्यादी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
--------------------------------------------------
#Pune #AirPollution #CleanAir #Environment #PMC #PublicHealth #Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/१६/२०२५ ०७:५१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: