उरण, दि. २४: "रायगडचे दिवंगत नेते अ. र. अंतुले यांच्या निधनानंतर कोकणातील काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी महेंद्र घरत हेच सक्षम आहेत. त्यांनी रायगडमध्ये काँग्रेस मजबूत केली असून, ते एक निष्ठावान आणि डॅशिंग नेते आहेत. त्यामुळे कोकणातील काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडेच सोपवावी," अशी मागणी कोकण विभागातील जिल्हाध्यक्षांनी महाराष्ट्राचे सहप्रभारी (कोकण विभाग) यू. बी. व्यंकटेश यांच्याकडे केली.
मुंबईतील 'टिळक भवन' येथे शुक्रवारी (ता. २३) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कोकण विभागाची बैठक झाली. या बैठकीत रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी यू. बी. व्यंकटेश यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्या ध्येयधोरणानुसार जिल्हाध्यक्षांना अधिकार देण्याची मागणी केली. "आम्ही ताकदीने लढायला तयार आहोत आणि आमचे कार्यकर्तेही सक्षम आहेत," असे ते म्हणाले.
ठाणे, पालघर, रायगड, भिवंडी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांच्या अध्यक्षांनी आपापली मते मांडली. ठाणे ग्रामीणचे दयानंद चोरघे म्हणाले, "काँग्रेस भक्कम आहे, फक्त आम्हाला अधिकार द्या." जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीला कोकणचे निरीक्षक राजेश शर्मा, उपाध्यक्ष गणेश पाटील, राजन भोसले, मिलिंद पाडगावकर आणि कोकणातील सुमारे २०० पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------------------------------------------------------------------------------------------- #KonkanCongress #MahendrashethGharat #CongressLeadership #TilakBhavan #MaharashtraPolitics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: