गुरुवार, २९ मे, २०२५

तोतया वकील महिलेकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न, पोलिसांनी रंगेहाथ पकडले

 


लोणी काळभोर: लोणी काळभोर पोलिसांनी एका तोतया वकील महिलेला खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. महिलेने एका ६३ वर्षीय व्यक्तीकडून ५ लाख ९४ हजार ६०/- रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४/०४/२०२५ ते २८/०५/२०२५ दरम्यान लोणी काळभोर येथे राहणाऱ्या एका महिलेने शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील एका ६३ वर्षीय व्यक्तीला आपण वकील असल्याचे खोटे सांगून दिशाभूल केली. महिलेने त्यांना त्यांच्या सुनेपासून घटस्फोट मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे घेतले. मात्र, घटस्फोट मिळवून दिला नाही.

याच महिलेने त्या व्यक्तीला त्यांच्या सुनेने त्यांच्याविरुद्ध बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, असे खोटे कारण सांगितले. त्यातून वाचवण्यासाठी पोलीस आणि कोर्ट कर्मचाऱ्यांसाठी पैसे लागतील, अन्यथा अटक होईल, अशी धमकी देऊन वेळोवेळी एकूण ५,९४,०६०/- रुपये  उकळले.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. तक्रारदार महिलेला खंडणीची रक्कम देताना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.

पोलिसांनी सापळा रचून महिलेला १५,०००/- रुपये रोख रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पैसे स्वीकारताना आणि आणखी पैशांची मागणी करतानाचे व्हिडिओ शूटिंगही पोलिसांनी केले. पोलिसांनी १५,०००/- रुपये जप्त केले आहेत.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२ वर्षे, रा. लोणी काळभोर) या महिलेला २८/०५/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०५, डॉ. राजकुमार शिंदे आणि सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक रत्नदीप बिराजदार, महिला पोलीस उप-निरीक्षक पूजा माळी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

  • -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------#Fraud, #Extortion, #Crime, #Pune, #Arrest

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा