काळेवाडीत भाजप महिला मेळावा; तृतीयपंथी समाजसेविकेचा गौरव
पिंपरी-चिंचवड, २९ मे – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड भाजप महिला मोर्चाच्या वतीने काळेवाडी येथील आरंभ लॉन्समध्ये भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तृतीयपंथी समाजसेविका डॉ. आम्रपाली मोहिते यांच्या समाजहिताच्या कार्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित नागरिक, विशेषतः महिलांची लक्षणीय गर्दी होती. सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. दिगंबर ढोकळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन करत त्यांच्या लोककल्याणकारी प्रशासकीय कार्याची माहिती दिली. त्यांच्या ओजस्वी विचारांनी उपस्थित श्रोते भारावून गेले.
या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे तृतीयपंथीयांच्या कार्याचा विशेष गौरव, ज्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक समावेशकतेची नवी उंची लाभली. सप्तरंगी आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. आम्रपाली मोहिते यांनी समाजातील दुर्बल, वंचित घटकांसाठी केलेल्या अतुलनीय कार्याची माहिती उपस्थितांसमोर मांडण्यात आली.
डॉ. मोहिते यांनी पुण्यात सिग्नलवरील मुलांसाठी सहा फूटपाथ शाळा सुरू केल्या आहेत. त्यांनी १३७ हून अधिक विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारत त्यांच्या शिक्षणासाठी शुल्क भरले आहे. बेघर मुलांना दररोज दूध वाटप, ससून रुग्णालयात अन्नछत्र, बेघर नागरिकांना वैद्यकीय मदत, आणि १५९ हून अधिक गरजू नागरिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यासारखे उपक्रम त्या राबवत आहेत.
त्यांचा कार्यक्षेत्रात तृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिला, एचआयव्ही बाधित रुग्ण, दिव्यांग बांधव, निराधार वृद्ध यांचा समावेश असून, आरोग्य, शिक्षण, आर्थिक मदत आणि महिला सक्षमीकरण यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत.
सत्काराने भावविवश झालेल्या डॉ. आम्रपाली मोहिते यांनी सांगितले की, “हा सन्मान माझ्या कार्याला नवा ऊर्जास्त्रोत ठरेल.”
या कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, आणि भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात सर्व मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची प्रेरणादायी आठवण करून देत, महिलांनी त्यांच्या आदर्शावर चालावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रशाहीर सुरेशराव सूर्यवंशी यांच्या “रणगाथा शौर्याचा” या पोवाड्याने करण्यात आला.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AmrapaliMohite #TransgenderRights #WomenEmpowerment #PimpriChinchwad #BJPWomen #AhilyadeviHolkar300 #SocialWork #InclusiveSociety #BJPMahilaMorcha
Reviewed by ANN news network
on
५/३०/२०२५ ०७:३५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: