ए एन एन न्यूज नेटवर्क दिनांक २६ मे २०२५ आजचे बातमीपत्र (PODCAST)

 


ए एन एन न्यूज नेटवर्क

दिनांक २६ मे २०२५

आजचे बातमीपत्र


आधुनिक शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयाने शेतीच्या बांधावरून जाणारे शेतरस्ते यापुढे किमान बारा फुट (3 ते 4 मीटर) रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, हार्वेस्टर यासारखी मोठी कृषी यंत्रे सहजपणे शेतापर्यंत पोहोचू शकतील. शेतमालाची जलद आणि सुरक्षित वाहतूकही शक्य होईल. शासनाच्या नव्या आदेशानुसार, या शेतरस्त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर 90 दिवसांत करावी लागेल. 7/12 उताऱ्याच्या "इतर हक्क" या विभागात शेतरस्त्याची नोंद केल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल आणि भविष्यातील वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

"शेतकऱ्यांना ज्या सवलती मिळतात, त्याच मच्छीमार बांधवांनाही मिळतील. मच्छीव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यामुळे हे शक्य झाले आहे. या सवलतींची १०० टक्के पूर्तता करण्यासाठी मी आणि माझे खाते प्रयत्नशील राहू," अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. करंजा येथे झालेल्या जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. मच्छीव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याबद्दल नितेश राणे यांचा करंजा येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते रवी भोईर, कौशिक शाह, तालुकाध्यक्ष धनेश गावंड, शहराध्यक्ष प्रसाद भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सोमवार, दिनांक २६ मे २०२५ पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कामगार कर्मचारी संघर्ष समितीचे मुख्य संघटक  संतोष पवार (उरण नगर परिषद) आणि उत्तर महाराष्ट्र नगर परिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी  रामदास पगारे (मनमाड नगर परिषद) हे या उपोषणात सहभागी होणार आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २० मार्च २०२३ रोजी विधान भवनात कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने कामगार संघटनांनी अनेक आंदोलने केली. तरीही अपेक्षित कार्यवाही न झाल्यामुळे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आमरण उपोषण केले जात आहे.

पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उप-आयुक्त (विशेष शाखा) मिलिंद मोहिते यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश २७ मे ते ९ जून   पर्यंत लागू राहतील. या काळात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या जमावाला आणि शस्त्रे, स्फोटक पदार्थ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनांची शक्यता तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.

मुंबईतील 'टिळक भवन' येथे शुक्रवारी   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कोकण विभागाची बैठक झाली. या बैठकीत रायगडचे दिवंगत नेते अ. र. अंतुले यांच्या निधनानंतर कोकणातील काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी महेंद्र घरत हेच सक्षम आहेत. त्यांनी रायगडमध्ये काँग्रेस मजबूत केली असून, ते एक निष्ठावान आणि डॅशिंग नेते आहेत. त्यामुळे कोकणातील काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडेच सोपवावी," अशी मागणी कोकण विभागातील जिल्हाध्यक्षांनी महाराष्ट्राचे सहप्रभारी (कोकण विभाग) यू. बी. व्यंकटेश यांच्याकडे केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विविध विभागांची कार्यपद्धती आणि शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा सखोल अभ्यास करण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनाला भेट दिली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या भेटीदरम्यान मीरा भाईंदरच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळात अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त शहर अभियंता दीपक खांबीत, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोरडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजप महिला मोर्चाने अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथील त्यांच्या ऐतिहासिक जन्मस्थळाला  भेट दिली. महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात ४२ महिलांनी भाग घेतला. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विजय शिंदे यांच्या संयोजनाने हा दौरा यशस्वीरित्या पार पडला.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मधील भारतीय सैनिकांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी उरणमध्ये 'भारत जिंदाबाद यात्रा' आयोजित करण्यात आली होती. २५ मे  रोजी सकाळी १२ वाजता उरण तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात झाली. उरणमधील आरपीआय कार्यालयापासून निघालेली ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे पोहोचली, डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सांगता झाली.

'देऊळ' आणि 'भारतीय' चित्रपटांचे निर्माते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिजीत घोलप यांच्या 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन' (नाफा) च्या वतीने कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे दुसऱ्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २५, २६ आणि २७ जुलै २०२५ रोजी हॉलिवूडच्या धर्तीवर संपन्न होणार असल्याची घोषणा नुकतीच अभिजित घोलप यांनी केली. गेल्या वर्षी 'नाफा'चा पहिला महोत्सव २७ आणि २८ जुलै २०२४ रोजी सॅन होजे येथे मोठ्या उत्साहात पार पडला होता. उत्तर अमेरिका आणि कॅनडामधील सुमारे साडेपाच लाख मराठी भाषकांपर्यंत मराठी चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशाने अभिजित घोलप 'नाफा'च्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांच्या माध्यमातून 'गुलकंद', 'सुजित सुशीला', 'संगीत मानापमान', 'चिकीचीकी बुबुम्बुम', 'पाणी', 'गुलाबी', 'नवरा माझा नवसाचा २', 'अशी ही जमवा जमावी', 'स्थळ' आणि 'सलतात रेशीम गाठी' यांसारखे अनेक मराठी चित्रपट अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.


बातमीपत्र संपले. धन्यवाद!

ए एन एन न्यूज नेटवर्क दिनांक २६ मे २०२५ आजचे बातमीपत्र (PODCAST) ए एन एन न्यूज नेटवर्क  दिनांक २६ मे २०२५  आजचे बातमीपत्र (PODCAST) Reviewed by ANN news network on ५/२६/२०२५ ०१:४९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".