मुंबई, दि. २४: महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सोमवार, दिनांक २६ मे २०२५ पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कामगार कर्मचारी संघर्ष समितीचे मुख्य संघटक कॉ. संतोष पवार (उरण नगर परिषद) आणि उत्तर महाराष्ट्र नगर परिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. रामदास पगारे (मनमाड नगर परिषद) हे या उपोषणात सहभागी होणार आहेत.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २० मार्च २०२३ रोजी विधान भवनात कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने कामगार संघटनांनी अनेक आंदोलने केली. तरीही अपेक्षित कार्यवाही न झाल्यामुळे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आमरण उपोषण केले जात आहे.
याव्यतिरिक्त, उरण नगर परिषदेतील कॉ. संतोष पवार आणि मनमाड नगर परिषदेतील कॉ. रामदास पगारे यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी देखील संघर्ष समितीने केली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे नेते कॉ. डॉ. डी. एल. कराड, ॲड. सुरेश ठाकूर, रामगोपाल मिश्रा, रामेश्वर वाघमारे, ॲड. सुनील वाळूंजकर, अनिल जाधव, अनिल पवार आणि आण्णा पाटील करणार आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------
#Mumbai #Maharashtra #MunicipalWorkers #NagarPanchayat #HungerStrike #Protest #WorkersRights #AzadMaidan
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा