गुरुवार, २९ मे, २०२५

वाढतोय चिकुनगुनिया, डेंग्यू आणि झिकाचा धोका; डासोत्पत्ती वेळीच रोखा! : पुणे महापालिकेचे आवाहन

 


पुणे, दि. २९ मे – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नागरिक, सोसायटी चेअरमन आणि विविध आस्थापनांच्या प्रमुखांना महत्वाचे आवाहन केले आहे. डासोत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेने काही नियम आणि दक्षता घेण्याच्या सूचनाही जारी केल्या आहेत.

आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे यांनी सांगितले की, झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी घरात व परिसरात पाणी साचणार नाही यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

महापालिकेच्या सूचनांनुसार नागरिकांनी खालील उपाययोजना कराव्यात:

  • कुंडीतील पाणी नियमित बदलावे, कुंडीखाली प्लेट ठेवू नये.

  • फ्रीजच्या मागील ट्रे आणि एअर कूलरमध्ये पाणी साचू देऊ नये.

  • ड्रम, बॅरल, पाण्याच्या टाक्या यांना झाकण असावे.

  • टेरेसवरील व जमिनीवरील टाक्यांना झाकून ठेवावे.

  • पार्किंग किंवा टेरेसवर साचलेल्या भंगाराची विल्हेवाट लावावी.

  • डास अंडी नष्ट करणाऱ्या गप्पी माशांचे पालन करावे.

  • आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा.

  • ड्रेनेज चेंबर झाकणावरील होलमध्ये वाळू/माती भरावी.

  • मोठ्या सोसायट्या, मॉल, थिएटर, गाडी वॉशिंग सेंटरमध्ये साचलेले पाणी काढावे.

  • पत्र्यावर, ताडपत्रीखाली, पन्हाळ्यांमध्ये पाणी साचू देऊ नये.

  • दिवसा चावणाऱ्या डासांपासून बचावासाठी पूर्ण बाह्याचे कपडे व डासप्रतिबंधक मलम वापरावे.

  • दिवसा झोपणाऱ्यांनी मच्छरदाणीचा वापर करावा.

  • बांधकाम साईट्स व अन्य ठिकाणी डासोत्पत्ती झाल्यास त्वरित कीटक प्रतिबंधक विभागाशी ०२०-२५५०८४७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

डॉ. बोराडे यांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत की, जर त्यांच्या आवारात डासोत्पत्ती आढळल्यास त्यांच्यावर महापालिका कारवाई करेल. म्हणून सर्वांनी दक्षता बाळगून सार्वजनिक आरोग्य टिकवण्यासाठी सहकार्य करावे.


#PMC #PuneNews #DengueAlert #ZikaVirus #MosquitoControl #PublicHealth #MonsoonPrecautions #PuneMunicipalCorporation #Chikungunya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा