मंगळवार, २७ मे, २०२५

पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, प्रशासनाला सतर्कतेचे आवाहन

 


शत्रुघ्न काटे यांनी प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगितले

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने प्रशासनाने आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर काटे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याची मागणी केली आहे.

शत्रुघ्न काटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या पावसामुळे शहरात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४ तास सुरू ठेवावीत. तसेच, अग्निशमन उपकरणे, बचाव साहित्य आणि वैद्यकीय किट यांसारखी आवश्यक उपकरणे तयार ठेवावीत. आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रशासनाने तात्काळ मदत आणि बचावकार्य करण्यासाठी सज्ज राहावे. पाण्याने भरलेले रस्ते, पुलांची स्थिती आणि विजेच्या तारांवर लक्ष ठेवावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

नागरिकांना मदत मिळावी यासाठी हॉटलाइन आणि सोशल मीडिया सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही काटे यांनी केली आहे.

नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच सखल भागात राहणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी. हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

----------------------------------------------------------------------------------------------

#Maharashtra #PimpriChinchwad #HeavyRainfall #DisasterManagement #Alert #WeatherWarning

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा